जलवाहिनीच्या गळतीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 11:12 PM2021-09-05T23:12:51+5:302021-09-05T23:15:51+5:30
सिडको : खोडे मळा परिसरातील नाल्याजवळील जलवाहिनीतून बारा तास झालेल्या पाण्याच्या गळतीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे रात्रभर मोठ्या प्रमाणात वाहिलेल्या पाण्याने नजिकच्या शेताचे नुकसान झाल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
सिडको : खोडे मळा परिसरातील नाल्याजवळील जलवाहिनीतून बारा तास झालेल्या पाण्याच्या गळतीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे रात्रभर मोठ्या प्रमाणात वाहिलेल्या पाण्याने नजिकच्या शेताचे नुकसान झाल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
सिडकोतील नाईक नगरपासून बडदेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोडे मळा परिसरातील नाल्याजवळून जलवाहिनी गेलेली आहे. खोडे मळा परिसरातील नाल्याजवळ शनिवार (दि.४) रोजी रात्री ८ वाजेपासून अचानक जलवाहिनीतून पाण्याची गळती सुरु झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जलवाहिनीतून धो-धो वाहणारे पाणी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. बरेच जण सदर प्रकार पाहून एकीकडे पाण्याच्या काटकसरीचे धोरण राबविणारी महानगरपालिका व दुसरीकडे पाण्याचा अपव्यय होत असतानाही निष्काळजीपणा करणारा पाणीपुरवठा विभाग यांना दुषणे देत निघून जात होते.
सदर बाब परिसरातील पत्रकारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्याशी तत्काळ संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व नॉट रिचेबल येत होते. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्याशी संपर्क साधल्यावर अर्ध्या तासात महानगरपालिकेचे कर्मचारी आले आणि सव्वा आठ वाजता पाण्याचा अपव्यय थांबला. तोपर्यंत बारा तासात लाखो लिटर पाणी परिसरातील शेत आणि नाल्यातून वाया गेले होते. या प्रकाराबद्दल सिडको तसेच खोडे मळा परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जलवाहिनी जेथून गेलेली आहे, त्या नाल्यालगतच माझी चहाची टपरी आहे. शनिवारी रात्री आठ वाजेपासून रविवार (दि.५) सकाळी सव्वा आठ वाजेपर्यंत जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. शनिवारी संध्याकाळी दोन जण या व्हॉल्व्हजवळ आले होते. ते गेल्यानंतर पाणी गळती सुरु झाली.
- सूरज केंदळे, खोडे मळा.