शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 09:31 PM2021-05-09T21:31:58+5:302021-05-10T01:07:17+5:30
नांदूर वैद्य : इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथे एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने घरातील सर्व वस्तू तसेच घराच्या कामासाठी ठेवलेली पाच लाखांची रोख रक्कम, चार तोळे सोने व संसारोपयोगी साहित्य आगीत जळून भस्मसात झाले.
नांदूर वैद्य : इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथे एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने घरातील सर्व वस्तू तसेच घराच्या कामासाठी ठेवलेली पाच लाखांची रोख रक्कम, चार तोळे सोने व संसारोपयोगी साहित्य आगीत जळून भस्मसात झाले.
सदर घटना रविवारी (दि.९) सकाळी नऊच्या सुमारास घडली. इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथील कैलास लुक्कड भगत व घरातील अन्य व्यक्ती बाहेर गेल्या असताना अचानक घराच्या वरच्या बाजून धूर येताना दिसला. ग्रामस्थांनी आरडाओरड करत पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु काही तासांतच आगीने रौद्ररूप धारण केले. सदर आग आटोक्यात येत नसल्याने इगतपुरी नगरपालिकेतील अग्निशामक दल तसेच महिंद्रा कंपनीतील अग्निशामक दल असे दोन पाण्याचे बंब पाचारण करण्यात आल्यानंतर काही तासांतच अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली. मात्र, तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झालेले होते.
आगीचे रूप इतके भयानक होते की, त्यामध्ये घराच्या कामासाठी नुकतीच आणलेली पाच लाखांची रोख रक्कम, चार तोळे सोने, तसेच रोजच्या वापरातील भांडी, गॅस, आदींसह सर्वच मौल्यवान वस्तू, कपडे, टीव्ही, फ्रीज आदी आगीत भस्मसात झाले.
या भीषण आगीत घरातील वापरायचे सर्व मौल्यवान साहित्य तसेच इतर सर्वच वस्तू जळून खाक झाल्यामुळे संबंधित कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. सदर कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला असून तलाठी तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी करून पंचनामा केला आहे.
घराच्या कामासाठी कर्ज काढून पाच लाख रुपये जमवले होते. पै पै जमा करून उभा केलेला संसार काही क्षणांत उद्ध्वस्त झाला आहे. या घटनेमुळे घराचे पूर्ण नुकसान झाले असून सोने, तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्यामुळे आमची खूप मोठी हानी झाली आहे.
- कचराबाई भगत, घरमालक, बलायदुरी.