येवला तालुक्यात बनावट मूर्तीकारांकडून लाखोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:04 PM2018-08-03T22:04:52+5:302018-08-03T22:05:04+5:30
येवला : गावामध्ये घराच्या दर्शनी भागात देवांच्या अथवा महापुरु षांच्या धातूंच्या मूर्ती ठेवण्याची अनेकांना हौस असते. या हौसेपोटी अनेक नागरिक एका मूर्तीसाठी हजारो रु पये मोजतात. परंतु याचा फायदा घेऊन तालुक्यातील गावामध्ये काही परप्रांतीय बनवत मूर्तीकाराकडून आपण मूर्तिकार असल्याचे भासवत अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे.
येवला तालुक्यातील अंदरसूल गारखेडा देवळणे,बोकटे आदी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना या भामट्यांनी शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबडेकर, आदी महापुरु षांच्या अथवा देवदेवतांच्या मूर्ती बाजार मूल्यापेक्षा कमी भावात घरपोहाच आणून देतो असे सांगून छापील जमापावती देत पोबारा केला आहे. भामट्यांनी अनेकांकडून थोडी थोडी रक्कम घेऊन लाखो रु पये गोळा केले. मात्र चार महिन्यांपासून गायब झालेल्या बनावट मूर्तीकारांकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अनेकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली आहे. मात्र व्यक्तिगत रक्कम कमी असल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी कोणीही समोर येत नसल्यामुळे ते पोलिसांच्या जाळ्यात येत नाहीत.
कोट...
मला देखील अंदरसूल परिसरातील माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीचा फोटो दाखविण्यात आला. त्यामुळे मी ११ एप्रिल २०१८ रोजी पैसे दिले. मात्र तीन महिने उलटून गेले, तरी मूर्ती मिळाली नाही. पावतीवरील क्रमांकावर संपर्क केला असता तो बंद असल्याचे निदर्शनास आले. याबद्द्ल पोलिसात तक्र ार दाखल करणार आहोत.
- अप्पासाहेब खैरनार, गारखेडा ता. येवला
तालुक्याच्या शेजारील कोपरगाव भागात अशा प्रकारच्या घटना ऐकून होतो. मात्र येवला तालुक्यातदेखील असे फसवणुकीचे प्रकार होत असतील तर ही गंभीर बाब आहे. आतापर्यंत ज्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे, त्यांनी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देण्यासाठी पुढे यावे, त्यानंतर पोलीस योग्य ती कार्यवाही करतील.
- बाळासाहेब भापकर, पोलीस निरीक्षक, येवला
इन्फो ...
अशी होते ग्रामस्थांची फसवणूक
शीख धर्मियांच्या वेशातील दोन-तीन जणांनी गावात येऊन रेकी करतात. गावातील हौशी आणि प्रतिष्ठीत लोकांची माहिती घेतात. त्यापैकी एखाद्या व्यक्तीला विना आगावू रक्कम घेता मूर्ती बसवून देतात व त्यांच्या सोबत फोटो काढून परिसरातील इतर नागरिकांना दाखवतात. ते पाहून इतर नागरिक आगाऊ रक्कम देऊन बुकिंग करतात व काही दिवसात मूर्ती घरपोहोच आणून देतो असे सांगतात. तशी पावती देखील देतात. त्या पावतीवर पंजाब राज्यातील विविध गावांचे चुकीचे पत्ते व फोन क्रमांक असतात. मात्र ग्राहक त्या वेळी शहानिशा न करता पैसे देऊन टाकतात व मूर्ती येण्याची वाट पाहत बसतात. बराच अवधी उलटल्यानंतरही मूर्तीकार न आल्याने संबंधित ग्राहक पावतीवर दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधतात, मात्र ते क्रमांक चुकीचे असतात. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे नागरिकांचे लक्षात येते, मात्र तोवर वेळ निघून गेलेली असते.