आॅनलाइन फसवणुकीतील लाख रुपये मिळाले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 06:53 PM2019-08-16T18:53:22+5:302019-08-16T18:53:36+5:30
सायबर पोलिसांची कामगिरी : येवला, चांदवड येथील प्रकार
नाशिक : आॅनलाइनद्वारे येवला आणि चांदवड येथील व्यक्तींना फसवून त्यांच्याकडून रक्कम उकळण्याचा प्रयत्न ग्रामीण सायबर पोलिसांनी हाणून पाडला असून संबंधित तक्रारदारांना त्यांची लाख रुपयाची रक्कम परत मिळवून दिली आहे.
ग्रामीण सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला येथील डॉ. प्रदीपचंद्र गायकवाड यांना अज्ञात क्रमांकावरून संपर्क साधत आपण बॅँकेतून बोलत असून तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढवायची असल्याचे सांगत के्रडिट कार्डची माहिती काढून घेतली. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर मागून घेत काही वेळातच त्यांच्या क्रेडिट कार्ड लिमिटमधील ९० हजार रुपये वळते झाल्याचा मेसेज गायकवाड यांना आला. या मेसेसमध्ये एका वॉलेट कंपनीचा उल्लेख होता. तर दुसऱ्या घटनेत चांदवड येथील मनोज साळी यांना ट्रॅव्हल्सचे बुकींग करताना एक आॅनलाइन लिंक आली व त्याद्वारे त्यांच्या खात्यातून १० हजार रुपये वळते करण्यात आले. गायकवाड आणि साळी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही दखल घेत गायकवाड यांची रक्कम काढून घेण्याच्या आत थांबविण्यात आली तर साळी यांना वॉलेटमध्ये गेलेली रक्कम परत मिळवून देण्यात आली. सदरची कार्यवाही पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार, उपनिरीक्षक कल्पेश दाभाडे, सोनाली पाटील. प्रमोद जाधव, परिक्षित निकम, प्रकाश मोरे, सुनील धोकट, विकास टेकुळे, प्राजक्ता सोनवणे यांच्या पथकाने केली.