आरोग्य विभागातही लाखोंचा घोटाळा?
By admin | Published: December 25, 2014 01:18 AM2014-12-25T01:18:46+5:302014-12-25T01:20:17+5:30
आरोग्य विभागातही लाखोंचा घोटाळा?
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील शिक्षण विभागातील दुबार वेतनासह अन्य काही बाबतीत झालेल्या शिक्षण विभागातील लाखो रुपयांच्या घोटाळ्याप्रमाणेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या वेतनवाढी व पदोन्नती दिल्याने लाखो रुपयांची अनियमितता झाल्याने त्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांकडून वसुली करण्याचा अहवाल तयार करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
आरोग्य विभागातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांना चुकीच्या पदोन्नत्या व वेतनवाढी दिल्याने जिल्हा परिषदेचे व पर्यायाने शासनाचे आर्थिक नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटल्याचे कळते. तब्बल दोन डझन पानांचा हा चौकशी व तपासणी अहवाल बुधवारी (दि.२४) मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे प्राप्त झाल्याचे समजते.(पान २ वर)
इगतपुरी तालुक्यात शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने दुबार वेतन व प्रोत्साहन भत्ते काढल्याने एक कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याने तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यासह विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहायक यांच्यासह अर्ध्या डझनहून कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता धरावा लागला होता. त्र्यंबकेश्वर तालुक्यातही आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा लाभ देताना शासन नियम व निकष न पाहताच वेतनवाढी देण्यात आल्याने त्यावर आक्षेप नोंदविण्यात आल्याचे कळते. त्यामुळे आरोग्य विभागाकडील सुमारे १०९ कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संकटात सापडण्याची शक्यता आहे. तसेच या कर्मचाऱ्यांकडून नियमात न बसणाऱ्या वेतनवाढी मिळाल्याने मागील काळात त्यांना दिलेल्या वेतनवाढी पोटीच्या रकमेची वसुलीही या अहवालात प्रस्तावित करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या घोटाळ्यानंतर आता पुन्हा आरोग्य विभागाचा वेतनवाढी संदर्भातील हा घोटाळा बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)