सोशल मीडियाच्या सकारात्मक वापरातून लाखोंची क्षुधाशांती : सुधीर मुतालिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 09:59 PM2020-04-25T21:59:22+5:302020-04-25T22:05:56+5:30
सोशल मीडियाच्या बऱ्या वाईट वापराबद्दल नेहमीच उलट सूलट चर्चा होत असतात. मात्र लॉकडाउन आणि संचारबंदीच्या काळात अन्नपूर्णा ही संकल्पना फेसबुक पेजवर राबविण्यात आली आणि राज्यात अनेक ठिकणी आपापल्या परिसरात भुकेल्यांना अन्न देण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले. या अन्नपूर्णा कल्पनेतून लाखो भुकेल्यांना भोजन मिळू शकले. सोशल मीडियाचा वापर सकारात्मकरीतीने केला तर त्याचा असा विधायक परिणाम पुढे येतो, असे मत अन्नपूर्णा योजनेचे संकल्पक आणि नाशिकमधील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुतालिक यांनी बोलताना व्यक्त केले.
नाशिक : गेल्या महिन्यात २३ मार्च रोजी देशभरात लॉकडाउन आणि संचारबंदी घोषित करण्यात आली. या एका निर्णयामुळे स्थलांतरित मजूर आणि कष्टकरीच नव्हे तर अनेक चांगल्या घरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे फेसबुकवर अन्नपूर्णा हे पेज तयार करून नागरिकांना आपल्या भागातील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यातून या पेजच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यातील लोक एकत्र आले आणि त्यांनी व्हॉट््सअॅप ग्रुपच्या माध्यमातून वंचितांना मदत देण्यास सुरूवात केली. त्याचा महिनाभरा मोठा विस्तार झाला आहे. त्याबाबत योजनेचे संकल्पक सुधीर मुतालिक यांच्याशी साधलेला संवाद..
प्रश्न: फेसबुकवर असे एखादे आवाहन करणे आणि त्यामाध्यमातून मदतीचे गट तयार करणे कसे काय शक्य झाले?
मुतालिक : मला मुळात संघटनाची आवड आहे. परंतु सोशल मीडियाचा त्यासाठी वापर करू शकतो. यावर माझा विश्वास आहे. सध्या सोशल मीडियाच्या बºया-वाईट वापराची नेहमी चर्चा होते.परंतु त्याचा विधायक वापर होऊ शकतो, यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर अडचणीत असणारे आणि यांना मदत करू शकणारे यांचा विचार करून फेसबुकवर अन्नपूर्णा पेज तयार केले. त्यातून लोकांना आवाहन केले. आपल्या परीसरातील कोणी अडचणीत असेल तर त्याला मदत करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी मदत माज्याकडे मागितली नाही तर आपल्या भागात जाऊन आपणच मदत करा, असे आवाहन केले. ती सर्वाधिक जमेची आणि योजना यशस्वीतेची बाजू ठरली.
प्रश्न : वेगवेगळ्या जिल्ह्यात गरजवंताना मदतीचे नियोजन कसे केले?
मुतालिक : फेसबुक पेजवर आवाहन केल्यांनतर अनेकांनी मदत करण्याची तयारी दर्शविली, परंतु त्याचबरोबर मदत मागणाऱ्यांनीदेखील संपर्क साधण्यास सुरुवात केली. मग त्या त्या भागात राहणाऱ्यांना मदत करण्यास सांगितले. नाशिक-पुणे आणि अन्य जिल्ह्यांतूनदेखील अनेक जण मदतीसाठी पुढे आल्याने त्यांना त्या त्या जिल्ह्याचे व्हॉट््स अॅप ग्रुप तयार करण्यास सांगितले. त्यामुळे आपापल्या भागातील गरजवतांची माहिती मिळू शकल्यानंतर संबंधित गरजवंत कोणाच्या घराजवळ राहतो याचा विचार करून संबंधितांना मदत केली जाऊ लागली. हेच साधे सूत्र होते. त्यातच आणखी एक भाग म्हणजे गरजवंताची गरज भागविण्यासाठी वेगळ काही करू नका केवळ आपल्या कुटुंबीयांसाठी भोजन बनविताना चार पोळ्या करणार असाल भुकेल्या व्यक्तिसाठी आणखी दोन पोळ्या तयार करा आणि त्याचीच त्याला मदत करा, असे सांगितले होते आणि त्यानुसारच घडत गेले.
प्रश्न : योजनेला कसा प्रतिसाद मिळत आहे?
मुतालिक : या योजनेत अनेक ठिकाणी वेगवेगळे ग्रुप तयार झाले. विधायक विचार करणाऱ्यांची साखळी तयार केली. त्यासाठी मी माझ्या उद्योजकीय संबंधांतून अनेकांना तयार केले. त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी अनेक नामांकित उद्योजक तयार झालेत. पणजीतून एक फोन आला आणि कर्नाटकात शिमगो येथल एक ा दीड दिवसांपासून भुकेल्या असलेल्या नोकरदार युवकाला मदत झाली. महामाार्ग प्राधीकरणाच्या एका अधिकाऱ्याने कळविल्यानंतर दोन तासात पुण्यातच वंचित कुटुंबाला मदत झाली. या संकल्पनेला इतका प्रतिसाद मिळतोय की लंडनजवळील एका गावातूनदेखील काही मदत हवी आहे का? अशी विचारणा झाली. नाशिकमध्ये उद्योजक अविनाश आव्हाड तसेच अॅड. सुयोग शहा यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेऊन हजारो वंचितांना भोजन दिले आहे.
मुलाखत - संजय पाठक