विंचूरच्या शेतकऱ्याला लाखोंना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 09:11 PM2021-03-15T21:11:05+5:302021-03-16T00:37:49+5:30
विंचूर : जिल्ह्यात द्राक्ष बागायतदारांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. येथील ज्ञानेश्वर दत्तू जाधव या शेतकऱ्याला द्राक्ष व्यापाऱ्याने अडीच लाखांना गंडावले असून, याप्रकरणी शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. येथील ज्ञानेश्वर जाधव या शेतकऱ्याकडून पंजाब येथील अमितकुमार अर्जुनदेव या व्यापाऱ्याने अडीच लाखांच्या वर द्राक्ष माल घेऊन फसवणूक केल्याने तरुण शेतकरी संकटात सापडला आहे.
जाधव यांच्या शेतातील थॉमसन हा द्राक्षमाल तयार असताना पंजाब येथील व्यापारी अमितकुमार अर्जुनदेव यांनी शेतात येऊन सौदा करून २८५० रु. क्विंटल या दराप्रमाणे द्राक्षमाल उचलला होता. अमितकुमार याने एकूण दोन लाख ५४ हजार ६२ रुपयांचा धनादेश जाधव यांना दिला. मात्र धनादेश बँकेत जमा केला असता परत आला. व्यापाऱ्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता मोबाइल बंद आला. परिसरातील अन्य शेतकऱ्यांनीही संबंधित व्यापाऱ्याला द्राक्षमाल दिला होता. त्यांनीही संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. व्यापाऱ्याबरोबर अन्य एका स्थानिक व्यक्तीने पैशाची हमी दिली असल्याने त्याच्याशी संपर्क केला असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने जाधव यांनी पोलिसांत धाव घेतली. संबंधितांची चौकशी करून शेतमालाचे पैसे मिळावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पूर्ण वर्षाची कमाई गेल्याने औषध दुकानदाराचे तसेच बँकेचे कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
दिघावकर यांच्याकडे तक्रार
जाधव या शेतकऱ्याची परराज्यातील व्यापाऱ्याकडून फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांमधून संतापाचे तसेच भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी शेतकऱ्याने विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापकुमार दिघावकर यांच्याकडेही तक्रार केली आहे. याच व्यापाऱ्याने परिसरातील अन्य शेतकऱ्यांकडूनही द्राक्षमाल घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे समजते. संबंधित व्यापाऱ्यावर गोंदेगाव येथील शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठ्या कष्टाने व अपेक्षेने द्राक्षबाग उभी केली होती. आर्थिक फसवणूक झाल्याने औषध दुकानदाराचे व बँकेच कर्ज कसे फेडावे हा मोठा प्रश्न आहे. संबंधितांची चौकशी करून माझे पैसे मिळावे हीच अपेक्षा आहे.
- ज्ञानेश्वर जाधव, शेतकरी, विंचूर