मन हो रामरंगी रंगले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 11:37 PM2020-08-04T23:37:11+5:302020-08-05T01:23:26+5:30
नाशिक : कोट्यवधी नेत्रांना लागलेली शतकांची आस...अन्् दशकांपासून बघितलेल्या एका स्वप्नपूर्तीचा साजसोहळा...बुधवारी प्रत्यक्षात साकारणार आहे. अयोध्येत राममंदिर उभारणीच्या कार्याचा भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि.५) होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोट्यवधी नेत्रांना लागलेली शतकांची आस...अन्् दशकांपासून बघितलेल्या एका स्वप्नपूर्तीचा साजसोहळा...बुधवारी प्रत्यक्षात साकारणार आहे. अयोध्येत राममंदिर उभारणीच्या कार्याचा भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि.५) होणार आहे. प्रभू श्रीरामांचा पदस्पर्श आणि वास्तव्याने पुनित झालेल्या नाशिकभूमीला जणू आनंदाचे उधाण आले आहे. त्यामुळेच नाशिकमधील संत, महंतांच्या आश्रमांसह सामान्य नागरिकांची मने आणि पंचवटी, तपोवनातील मंदिरे मंगळवारपासूनच जणू राम रंगी रंगल्यासारखी झाली होती.
प्रभू श्रीरामांचे वास्तव्य ज्या दंडकारण्यात आणि नाशिकच्या पवित्र भूमीत प्रदीर्घ काळ होते, त्या भूमीतील प्रत्येकाच्या मनात अयोध्येत मंदिराचे पुनर्निर्माण होत असल्याचा आनंद अगदी ओसंडून वहात आहे. त्यामुळेच कुठे गुढी उभारली, कुठे दीपोत्सव, कुठे रांगोळीने स्वागत, तर कुठे घंटानादाचे आयोजन अशी लगबग समस्त नाशिकमधील मंदिर, मठांमध्ये दिसून येत आहे. ज्या पंचवटीच्या परिसरात प्रभू श्रीरामांचे वास्तव्य होेते, त्याच परिसरात उभ्या असलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिरातही मंगळवारीच दीपोत्सव करून लखलखाट करण्यात आला. त्याशिवाय बुधवारी पहाटे नियमित काकडआरती, सकाळी पाद्यपूजनाचा दैनंदिन सोहळा पार पाडला जाणार आहे. तसेच माध्यान्हीच्या नियमित आरतीनंतरदेखील घंटानादाने या सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला जाणार आहे, तर कपालेश्वर मंदिरामागील शौनकाश्रम परिसरात उभारलेल्या गुढीनेदेखील समस्त पंचवटीवासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. समस्त पंचवटी आणि तपोवनातील मंदिर, मठांवर मंगळवारपासूनच भगव्या रंगाची जणू शाल पांघरल्यासारखे भासत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील भूमिपूजन सोहळ्यास मोजक्याच लोकांना जाता येणार असल्याने त्यात नाशिककरांना संधी मिळालेली नसली तरी त्याचा खेद न मानता समस्त नाशिककर रामनामाच्या जयघोषात दंग झाले आहेत.