मिनी मंत्रालयाच्या इच्छुकांना आरक्षणाचे लागले वेध
By admin | Published: February 18, 2016 11:56 PM2016-02-18T23:56:17+5:302016-02-18T23:56:44+5:30
गट रचनेबाबतही उत्सुकता : जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक
नाशिक : अवघ्या दहा महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक राहिल्याने मिनी मंत्रालय म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्यांना जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण रचना व आरक्षणाबाबत वेध लागल्याचे चित्र आहे.
गट व गणाची रचना तयार करण्यासाठी जादा कालावधीची प्रक्रिया राबवावी लागत असून, त्यानुसार गट व गणांच्या संख्येत वाढ किंवा घट आणि त्यानुसार मागविलेल्या हरकती व सुनावणी यांसह महिना दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे.
विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांची मुदत जरी २१ मार्चपर्यंत असली तरी त्यापूर्वीच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना निवडणुकांना सामारे जावे लागणार आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेचे ७३ गट व पंचायत समितीचे १४६ गण आहेत. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या सात गटांच्या रचना व नवनियुक्त गटांची निर्मिती करणे जिल्हा निवडणूक कार्यालयास आवश्यक आहे. त्यातील
चांदवड गटाची यापूर्वीच कानमंडाळे गटात रूपांतर झाले आहे. त्यामुळे दिंडोरी, देवळा, सुरगाणा, निफाड, पेठ व कळवण गटांची
रचना करणे अद्याप बाकी आहे. या गटांऐवजी आता तालुका स्तरावर नगरपंचायत, परिषदा यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे दिंडोरी गटाचे मोहाडी, सुरगाणा गटाचे बोेरगाव, निफाड गटाचे पिंपळस रामाचे, देवळा गटाचे पिंपळगाव वाखारी किंवा कणकापूर-खर्डे, कळवण गटाचे मानूर, पेठ गटाचे करंजाळी गटात रूपांतर होण्याची शक्यता आहे.
त्यातच गटनिहाय आरक्षण येत्या जुलै किंवा आॅगस्टमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)