विभागात एसटी अपघाताचे अत्यल्प प्रमाण : सुरक्षित बस चालविणारे १०१ चालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:25 AM2021-02-06T04:25:13+5:302021-02-06T04:25:13+5:30
नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी बस वाहतुकीबाबत प्रवाशांच्या मनात सुरक्षिततेची भावना असल्यामुळेच राज्यात एसटी प्रवासाला अधिक प्राधान्य दिले जाते. ...
नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी बस वाहतुकीबाबत प्रवाशांच्या मनात सुरक्षिततेची भावना असल्यामुळेच राज्यात एसटी प्रवासाला अधिक प्राधान्य दिले जाते. प्रवासी वाहतुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाकडून देखील सुरक्षित प्रवासासाठीची काळजी घेतली जाते. त्यामुळेच चालकांना प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी विनाअपघात चालकांचा सत्कार केला जातो. गेल्यावर्षी कोविडमुळे आठ महिने प्रवासी वाहतूक बंद होती. त्यामुळे २०१९-२० मध्ये सुरक्षित प्रवासाची सेवा लक्षात घेत १०१ चालकांचा मध्यवर्ती कार्यालयाकडून गौरव करण्यात आला.
नाशिक विभागात १३ डेपो असून सुमारे १६५० इतके बसचालक असून शहर आणि ग्रामीण भागातील प्रवासी वाहतुकीची जबाबदारी पार पाडली जाते. सुरक्षित प्रवासी वाहतूक व्हावी यासाठी महामंडळाच्यावतीने व्यापक उपक्रम राबविले जातात. सुरक्षितता सप्ताहात तर विशेष काळजी घेतली जाते. सुरक्षिततेबाबत प्रवासी तसेच चालक वाहकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबतचे प्रबोधन केले जाते. कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाहतुकीची शपथही दिली जाते. प्रवासी वाहतूक क्षेत्रात असल्यामुळे चालकांनी अधिक जबाबदारीने बस चालवावी, यासाठी चालकांना वेळाेवेळी प्रशिक्षण दिले जाते.
महामंडळाच्या अपघात विभागाकडून चालकांच्या कामगिरीची दखल घेतली जाते. विनाअपघात आणि अपघात झालेल्या चालकांची माहिती या विभागाकडे संकलित केली जाते. त्यानुसार चालकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून चालकांना वेतनवाढ दिले जाते. गरज असलेल्या चालकांना रिफ्रेशमेंट कार्यशाळेतही पाठविले जाते. चालकांच्या डोळ्यांची नियमित तपासणीदेखील केली जाते. सुरक्षित अपघाताबाबत जास्तीत जास्त उपायोजना करण्याबाबत महामंडळाकडून नियोजन केले जाते.
--इन्फो--
७०ला स्पीड लॉक
प्रवासी वाहतुकीची जबाबदारी असल्यामुळे महामंडळाच्या बसेसची गती मर्यादित केली जाते. गाड्यांचा वेग ७० वर लॉक करण्यात आलेला आहे. त्यामुळे चालकांना या गतीच्या पुढे गाडी चालविता येत नाही. बस अनियंत्रित चालविली जाऊ नये किंवा लागलीच बसवर नियंत्रण मिळविण्यात यावे, यासाठी बसला वेग नियंत्रणाचे निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्याबाबतची नियमित तपासणी देखील केली जाते.
--इन्फो--
जिल्ह्यातील एसटीचालक : १६५०
१७ : दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा
०६ : पंधरा वर्षांपेक्षा जास्त सेवा
--इन्फो--
मागील वर्षात झालेले एसटीचे अपघात
जानेवारी- १९
फेब्रुवारी-१२
मार्च-१५
एपिल- १२
मे-१४
जून-१९
जुलै-१७
ऑगस्ट-१८
सप्टेंबर-२०
ऑक्टोबर-२०
नेाव्हेंबर-१४
डिसेंबर-१६