थंडीचा कडाका : तपमानाचा पारा ९.४ अंशापर्यंत घसरला; हंगामातील नीचांकी नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:05 PM2018-12-11T13:05:27+5:302018-12-11T13:09:17+5:30
हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तपमान १०.२ अद्याप नोंदविले गेले होते; मात्र मंगळवारी (दि.११) हा रेकॉर्ड ब्रेक झाला. पारा थेट ९.४अंशापर्यंत घसरल्याने राज्यातील सर्वाधिक कमी किमान तपमान नाशिकमध्ये नोंदविले गेले
नाशिक : हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तपमान १०.२ अद्याप नोंदविले गेले होते; मात्र मंगळवारी (दि.११) हा रेकॉर्ड ब्रेक झाला. पारा थेट ९.४अंशापर्यंत घसरल्याने राज्यातील सर्वाधिक कमी किमान तपमान नाशिकमध्ये नोंदविले गेले. नाशिकला थंडीचा कडाका वाढला असून पुढील दोन दिवस किमान तपमानात घसरण कायम राहणार असल्याने नाशिककरांना थंडीच्या तीव्रतेचा सामना करावा लागणार आहे.
राज्यात सोमवारी (दि.१०) सर्वाधिक कमी तपमानाची नोंद नाशिकमध्ये झाली होती. शहरात किमान तपमान १२.८ तर कमाल तपमानाचा पारा थेट २८.२ अंशापर्यंत खाली घसरला होता. त्यामुळे सध्या राज्यात नाशिक महाबळेश्वरपेक्षाही अधिक थंड शहर बनले आहे. मागील काही दिवसांपासून किमान तपमानाचा पारा कमी-जास्त होत असल्याचे थंडीची तीव्रतेतही फरक पडत होता; मात्र अचानकपणे या आठवड्यात हवामानात कमालीचा बदल झाला. गेल्या शनिवारी (दि.१) शहरात सर्वाधिक थंडीचा कडाका जाणवला. त्यादिवशी कमाल तपमानाचा पारा २६.१ अंशापर्यंत तर कि मान तपमान ११.२ अंशापर्यंत घसरले होते. त्यानंतर सातत्याने किमान तपमानासह कमाल तपमान सलग चार दिवस कमी राहिले. २८.२ अंशापर्यंत कमाल तपमान खाली घसरले होते. त्यानंतर पुन्हा कमाल तपमान वाढल्याने थंडीची तीव्रता कमी झाली होती; मात्र अचानकपणे ३१ अंशापर्यंत पोहचलेला कमाल तपमानाचा पारा थेट सोमवारी २८.२ अंशापर्यंत घसरला तर किमान तपमान १३.४ अंशावरून १२.२ अंशापर्यंत खाली आले. वातावरणात सोमवारी सकाळी ७६ टक्के इतके आर्द्रतेचे प्रमाण हवामान केंद्राकडून मोजण्यात आले. एकूणच हवामानात बदल झाला असून नागरिकांना हिवाळा चांगलाच अनुभवयास येऊ लागला आहे. राज्यात आतापर्यंत या हंगामात किमान तपमानाची नीचांकी नोंद प्रथमच नाशिकमध्ये झाली. निफाड तालुक्यात अचानकपणे पारा नऊ अंशापर्यंत सोमवारी घसरला होता. त्यामुळे तालुका गारठला असून, शेतकरी, ऊसतोड कामगारांनी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला. ही थंडी गहू, कांदे या पिकांच्या दृष्टीने पोषक ठरणार आहे.
थंडीचा कडाका वाढताच शहरात वाढत्या थंडीच्या तीव्रतेमुळे उबदार कपड्यांनाही मागणी वाढली आहे. स्वेटर, जॅकेट, टोपी, मफलर, हातमोजे, पायमोजे यांसारख्या उबदार कपड्यांच्या खरेदीवर नाशिककर भर देत आहेत. थंडी वाढल्यामुळे निफाडसह शहरी भागातदेखील रात्रीच्या शेकोट्या पेटू लागल्या आहेत. मंगळवारी सकाळी किमान तपमान अधिकच घसरले. पारा थेट ९.४अंशापर्यंत खाली आल्याने थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. सकाळी नाशिककर संपुर्णत: उबदार कपड्यांनी पॅक होऊनच घराबाहेर पडले.
दोन दिवसांपर्यंत थंडीचा कडाका
शहराचे हवामान अचानकपणे बदलले असून येत्या दोन दिवसांपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार असून गुरूवारनंतर (दि.१३) किमान तपमानात १अंशाने वाढ होऊ शकते असा अंदाज मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे नाशिककरांना थंडीच्या तीव्रतेचा सामना गुरूवारपर्यंत करावा लागू शकतो. कमाल तपमान वाढल्यास काही अंशी वातावरणात उष्मा निर्माण होऊन थंडीपासून दिलासा मिळू शकेल असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.