माघार छगन भुजबळ यांची, राष्ट्रवादीचा नाशिकवर दावा कायम
By संजय पाठक | Published: April 20, 2024 05:16 PM2024-04-20T17:16:42+5:302024-04-20T17:23:15+5:30
छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली असली तरी त्यांनी उमेदवारीत माघार घेतली, जागेवरील दावा सोडलेला नाही असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
संजय पाठक, नाशिक : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघासाठी रस्सीखेच कायम असतानाच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली असली तरी त्यांनी उमेदवारीत माघार घेतली, जागेवरील दावा सोडलेला नाही असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे नाशिकच्या जागेची मागणी केली होती, ती कायम असून वरिष्ठांकडून यासंदर्भात निर्णय काय होतो, हे अधिकृतरीत्या कळवले जाईल, असे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले.
लोकसभा मतदारसंघात यंदा शिंदेसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दावा सांगितल्याने स्पर्धा वाढली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आल्यानंतर सेना आणि राष्ट्रवादीत स्पर्धा तीव्र झाली होती. छगन भुजबळ यांना थेट भाजपा नेते अमित शहा यांनी उमेदवारी करण्यास सांगून देखील उमेदवारी घोषीत न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
काल छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता शिंदेसेनेच्या उमेदवारीचा मार्ग प्रशस्त झाला असे मानले जात असताना आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा दावा कायम असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाशिकची जागा सुटावी, अशी मागणी प्रदेश नेत्यांकडे केली होती, त्यांनी जोपर्यंत ही जागा आपण लढत नसल्याचे सांगितले नाही तोपर्यंत दावेदारी कायमच आहे, असे सांगितले.