मंत्री दादा भुसेंच्या वाहनाला कट मारला; मंत्र्यांनी केला पाठलाग, गाडीतून होती अवैध वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 10:03 PM2023-04-14T22:03:57+5:302023-04-14T22:14:28+5:30
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला एका पीक अप वाहनाने कट मारुन पळण्याचा प्रयत्न केला
नाशिक - शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी काही महिन्यांपूर्वी एका चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता, त्यावेळी त्यांनी चोराच्या कानशिलातही लगावली होती. त्यानंतर, आता दादा भुसेंनी चक्क वाहनाचा पाठलाग करत वाहनचालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे या वाहनाने मंत्री दादा भुसेंच्या वाहनाला कट मारुन गाडी सुसाट वेगाने पळवली होती. त्यामुळे, संशय आल्याने दादा भुसेंनी त्याचा पाठलाग केला. त्यात, गोवंश वाहतूक करण्यात येत असल्याचे दिसून आले.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला एका पीक अप वाहनाने कट मारुन पळण्याचा प्रयत्न केला. मंत्री दादा भुसे यांनी त्याचा पाठलाग करत रस्त्यावरच त्या वाहनधारकला पकडले. त्यावेळी, या वाहनातून अवैधरित्या गोवंश वाहतूक केली जात असल्याचे घटना उघडकीस आली. त्यामुळे, मंत्री भुसे यांनी तात्काळ हे वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भुसे हे ग्रामीण भागात भेटीसाठी जात असतांना हा प्रकार घडला. दरम्यान, या घटनेमुळे अवैध गोवंश वाहतुक पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.
गाडीला कट मारल्यावरुन भांडणं होत असतात. मात्र, चक्क मंत्रीमहोदयांच्या गाडीला कट मारल्यानंतर त्यांनीही वाहनचालकाचा पाठलाग केल्याची घटना दुर्मिळच. मात्र, या घटनेमुळे अवैध गोवंश वाहतूक टळली अन् पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्याात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीतून छुप्या पद्धतीने अवैध वाळू वाहतूक, गोवंश वाहतूक तसेच लाकूड वाहतूक आदी सुरू असल्याचा गुप्त चर्चा होत आहेत. याबाबत संबंधित विभागाकडून रात्रीतून गस्त वाढवून अनाधिकृत वाहतूकीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.