बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी मंत्र्यांकडून वनविभागाला सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 05:49 PM2018-09-06T17:49:44+5:302018-09-06T17:50:13+5:30
दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाच्या मृत्यूनंतर भयभीत झालेल्या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. वनमंत्र्यांनी वनविभागाच्या सचिवांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सोमवारी (दि. ३) परमोरी येथे बिबट्याने सार्थक ज्ञानेश्वर दिघे या तीन वर्षाच्या मुलाला ठार केले होते. या घटनेमुळे पंचक्रोशीतील शेतकरी, मजूर भयभीत झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर झिरवाळ यांनी दिंडोरी तालुक्यातील शेतकरी शिष्टमंडळाला सोबत घेऊन बुधवारी (दि. ५) वने व वित्तमंत्री मुनगंटीवार यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी झिरवाळ यांनी दिघे कुटुंबियांना अधिकाधिक आर्थिक मदत करावी तसेच तालुक्यातील बिबट्यांना पकडण्याचे आदेश द्यावेत, शेतावर व गावांमध्ये सोलर लाईट देण्याची व्यवस्था करावी, गावाला कुंपण करण्यात यावे आदी मागण्या केल्या. त्यावर मुनगंटीवार यांनी झिरवाळ तसेच शेतकऱ्यांसोबत सखोल चर्चा करून वन विभागाच्या सचिवांना वरील योजना अंमलात आणण्यासाठी तातडीने बैठक घेण्याचे व त्यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले. तसेच लवकरात लवकर सर्व मागण्या पूर्ण करण्याचे शिष्टमंडळास आश्वासन दिले. याप्रसंगी सोमनाथ कारभारी दिघे, दगु दिघे, महेश शिवले, अनिल दिघे, राकेश दिघे, पप्पू शिवले, डॉ. अनिल सातपुते व ग्रामस्थ उपस्थित होते.