मराठा समाजाच्या आवाहनानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा रद्द
By Suyog.joshi | Published: October 29, 2023 02:06 PM2023-10-29T14:06:32+5:302023-10-29T14:23:27+5:30
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यात कोट्यवधी गावानी सहभाग घेतला
नाशिक (सुयोग जोशी): येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे येत्या मंगळवारी (दि. ३१) होणारा नियोजित कार्यक्षम आमदार पुरस्कारासाठी येणाऱ्या राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा नियोजित कार्यक्रम सकल मराठा समाजाचे मराठा उपोषणकर्ते नाना बच्छाव व सहकाऱ्यांनी आवाहन केल्याने पुढे ढकलला आहे,असे सार्वजनिक वाचनालयाने काढलेल्या पत्राद्वारे कळविले आहे. सोशल मीडियावर सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकावर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यास कार्यक्षम पुरस्काराने मंगळवारी गौरवणार असा मेसेज होता, हा मेसेज बघताच नाशिकला गेल्या ४५ दिवसापासून अखंडित उपोषणात बसलेले उपोषणकर्ते नाना बच्छाव व सहकाऱ्यांनी बघितला व सार्वजनिक वाचनालयाचे संचालक संजय करंजकर,सोमनाथ मुठाळ यांना फोन केला.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यात कोट्यवधी गावानी सहभाग घेतला असून गाव खेड्यात शहरात मंत्री नेत्यांना बंदी असतांना आपण मंत्र्याला का बोलवले असा सवाल केला. याबाबत नाशिक सार्वजनिक वाचनालयाचे सचिव डॉ धर्माजी बोडके यांच्या स्वाक्षरीने पत्रक काढून संबंधित कार्यक्रम पुढे ढकलला असे पत्रक सकल मराठा समाज उपोषणकर्त्याना कळवले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत फसवणूक केल्याचा आरोप करीत नाशिकमधील कार्यकर्त्यांपैकी नाना बच्छाव यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनेाज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ कार्यकर्त्यांनी गेल्या ४५ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. तसेच जिल्ह्यात पुढाऱ्यांना गावबंदी असताना आमदार, खासदार, मंत्र्यांनी नाशिक शहर व गावात कुठलाही कार्यक्रम घेऊ नये, काही विपरीत घडल्यास राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा आंदाेलकांच्यावतीने देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी दौरा रद्द केला आहे.