आम्हीच ज्ञानी असल्याचा काही नेत्यांचा अर्विभाव; विखे पाटलांचा नाव न घेता पवारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 12:02 PM2019-08-15T12:02:44+5:302019-08-15T12:03:37+5:30
काही विरोधी नेते खूपच ज्ञानी असल्यासारखे वागत असतात. त्यात काही विशेष नाही विरोधी पक्ष नेत्यांचे ते कामच असते मी पण विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलं आहे.
नाशिक- राज्यात पूर परिस्थिती गंभीर असतानाही सरकार चांगलं काम करीत आहे. मात्र काही जण आम्हीच ज्ञानी आहोत अशा अर्विभावात काम करत असतात असा टोला राज्याचे गृह निर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना आज नाशिकमध्ये लगावला.
देशाचा स्वातंत्र्य दिन नाशिकमध्ये उत्साहात साजरा झाला. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे पुरामुळे नुकसान झाले आहे. शेती आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे अशा वेळी सरकार चांगले काम करीत आहे असे सांगून काही विरोधी नेते खूपच ज्ञानी असल्यासारखे वागत असतात. त्यात काही विशेष नाही विरोधी पक्ष नेत्यांचे ते कामच असते मी पण विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलं आहे असेही विखे पाटील म्हणाले.
पालकमंत्री म्हणून कोणाला कोठे नियुक्त करावे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. नाशिक किंवा अहमदनगर अशा कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली तर आपण अवश्य पार पाडू असेही विखे पाटील म्हणाले
बुधवारी शरद पवार यांनी कोल्हापूरात पूरग्रस्तांची पाहणी करताना राज्य सरकारवर टीका केली. पूरग्रस्तांसाठी मदत पोहचविण्याची सर्वांची तयारी आहे. मात्र जी मदत येते ती पूरग्रस्तांना योग्यरितीने पोहचविण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणांनी घेतली नाही. काही ठिकाणी ट्रक अडवले जात असल्याची माहिती आहे. शासनाने गरजू पूरग्रस्तांना ही मदत पोहचेल अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. सरकारमधील लोकांना अशा परिस्थितीला तोंड देण्याचा अनुभव नाही. काही गावांना भेटी देऊन निघून गेल्यानं काम होतं नाही. राज्यकर्ते याठिकाणी असताना प्रशासनाची हालचाल तातडीने होते. लातूरला भूकंप झाला तर मी 15 दिवस तिथे होतो अशी आठवण शरद पवारांनी करुन दिली होती.