मंत्र्यांचं शेड्युल बदललं, मोदींच्या सूचनेनंतर @ 9.30 वाजताच कार्यालयात हजर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 10:27 AM2019-06-19T10:27:06+5:302019-06-19T10:27:16+5:30
केंद्रीय मंत्र्यांकडून कार्यालयीन वेळ पाळण्यात येत असून बहुतांश मंत्री सकाळी साडे 9 वाजताच कार्यालयात दाखल होत
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनंतर सर्वच कॅबिनेटमंत्री आपल्या कार्यालयीन वेळांचे नवीन वेळापत्रक बनवत आहेत. अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास नख्वी यांनी आपलं वेळापत्रक नव्याने बनवलं असून त्यामध्ये सकाळी साडे 9 वाजता कार्यालयात पोहोचण्याचं ठरविण्यात आलं आहे. तर केंद्रीयमंत्री रामविलास पासवानही आज सकाळी 9 वाजताच आपल्या कार्यालयात दाखल झाले असून त्यांनी कार्यालयातील प्रमुख सचिवांची बैठक घेतली.
केंद्रीय मंत्र्यांकडून कार्यालयीन वेळ पाळण्यात येत असून बहुतांश मंत्री सकाळी साडे 9 वाजताच कार्यालयात दाखल होत असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. तर घरातूनच ऑफिस काम करण्याचे या मंत्र्यांकडून टाळले जात आहे. विशेष म्हणजे मोदींच्या सूचनेनंतर मंत्र्यांमध्ये हे बदल झाल्याचे जाणवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांना वेळेत कार्यालयात पोहोचण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच, कार्यालयीन काम घरातून न करण्याचाही सल्ला दिला होता. त्यामुळे मंत्रिमंडळात हा बदल जाणवत आहे.
मंत्रिमंडळातील काही मंत्री आपले जुनेच वेळापत्रक फॉलो करत आहेत. कारण, ते मंत्री यापूर्वीही सकाळी साडे 9 वाजता आपल्या कार्यालयात पोहोचत असत. या मंत्र्यांमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा समावेश आहे. नवीन कॅबिनेटमधील जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांसह अनेक तरुण मंत्रीमहोदय पहिल्याच दिवशी सकाळी साडे 9 वाजता ऑफिस कामावर हजर झाले आहेत. दरम्यान, मंत्रिमहोदय सकाळी 9.30 वाजता कार्यालयात हजर होत असल्याने कर्मचारी आणि तेथील इतर स्टाफही आपली वेळ पाळत असून कार्यालयात मंत्र्यांच्या अगोदरच हजर होताना दिसत आहे.