अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:42 PM2017-09-15T23:42:51+5:302017-09-15T23:44:39+5:30
नाशिक : अल्पवयीन शाळकरी मुलीस जबरदस्तीने दुचाकीवर बसवून स्वत:च्या घरी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (दि़१२) दुपारच्या सुमारास घडली आहे़ याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात बलात्कार व लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही मूळची परभणी जिल्ह्यातील असून, तिचे कुटुंबीय सद्यस्थितीत अशोका मार्ग परिसरात राहतात़ मंगळवारी (दि ़१२) अल्पवयीन शाळकरी मुलगी पुणेरोडवरील आपल्या शाळेत गेली होती़ शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी ती सिद्धार्थनगर बसस्टॉपवर उभी असताना पंचवटीतील ओळखीचा संशयित दुचाकीवर तिथे आला व बळजबरी गाडीवर बसविले़ यानंतर मुलीस स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला़ तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास मुलीच्या आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली़
पीडित मुलीने घरी पोहोचल्यानंतर आई-वडिलांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ दरम्यान, पोलिसांनी संशयित युवकास ताब्यात घेतले असून, तो अल्पवयीन असल्याने त्यास न्यायालयात हजर केले असता त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे़