पदवीधरांच्या अल्प नोंदणीने आयोग नाराज
By admin | Published: October 20, 2016 02:07 AM2016-10-20T02:07:00+5:302016-10-20T02:11:10+5:30
दोन दिवस विशेष मोहीम : जनजागृतीवर भर
नाशिक : गत निवडणुकीत लाखापेक्षा अधिक मतदार असलेल्या पदवीधरांनी नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या नवीन मतदार नोंदणीकडे पाठ फिरविल्यामुळे निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त करीत, प्रशासन यंत्रणेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असून, त्यामुळेच की काय पदवीधर मतदार नोंदणीसाठी शनिवारी व रविवारी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने पदवीधर मतदार संघाची जुनी मतदार यादी पूर्ण रद्द करून नवीन यादी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पदवीधर मतदार संघासाठी २००९ मध्ये वापरली गेलेली यादी व त्यानंतर दोन वेळा पुरवणी यादीत नाव नोंदविलेल्या पदवीधरांची नावेही रद्द ठरली आहेत. नाशिक जिल्ह्यात जवळपास एक लाख ३५ हजाराहून अधिक पदवीधरांची नावे याकाळात नोंदली गेली होती. आता मात्र १ आॅक्टोबरपासून पदवीधर मतदार यादीसाठी नाव नोंदणी सुरू करूनही त्याला त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याची बाब आयोगाने अधिक गांभीर्याने घेतली आहे. आयोगाकडून दररोज नोंदणीची माहिती घेतली जात असून, नाशिक जिल्ह्यात १८ आॅक्टोबर अखेर ८२८६ इतक्याच पदवीधरांनी नोंदणी केली आहे. येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याची मुदत असून, आगामी पंधरा दिवसांत हे प्रमाण वाढविण्यासाठी काय काय करता येईल याची चाचपणी केली जात आहे. शनिवार व रविवार दोन दिवस शासकीय सुट्या असल्याने त्यादिवशी मंडळ अधिकारी कार्यालय, प्रत्येक विधानसभा मतदार संघातील निवडणूक शाखा, तलाठी कार्यालये अशा महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये पदवीधरांचे नाव नोंदणीचे अर्ज वाटप व स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)