कनाशी येथील मेनरोडची दुरवस्था
By admin | Published: February 23, 2016 10:46 PM2016-02-23T22:46:21+5:302016-02-23T22:58:27+5:30
वाहनधारक त्रस्त : बांधकाम विभाग सुस्त
कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथील मुख्य रस्त्याची दोन वर्षांपासून चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सुस्त असल्याचे चित्र रस्त्याची अवस्था बघितल्यावर लक्षात येते. सदर रस्त्याचे खड्डे बुजविण्यासाठी नागरिकांनी स्वत: पुढाकर घेतल्यानंतर ग्रामपंचायतने रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. सदर रस्त्याचे काम तत्काळ सुरू न झाल्यास दि. १ मार्चपासून कनाशी-सापुतारा रस्त्यावर रास्ता रोको करण्यात येणार आहे.
रस्त्यावर दोन वर्षापासून डांबरीकरण केले नसल्याने मोठे दगड वर आले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सदरचा रस्ता हा गुजरात राज्यात जाण्यासाठी सोयीस्कर असल्याने वाहनधारक पसंती देतात. परंतु दोन वर्षापासून वाहनधारकांचा या रस्त्यावरून खडतर प्रवास सुरूच
असून, अद्यापही बांधकाम विभाग याकडे लक्ष देण्यात तयार नाही. त्यामुळे वाहनधारकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने या रस्त्याकडे पाठ फिरवली आहे.
सद्यस्थितीत या रस्त्यावरील जाड खडी वर आल्याने वाहनधारकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर सर्वत्र जाड खडी पसरलेली आहे. त्यामुळे वाहने घसरण्याबरोबरच पंक्चरही होत असून, मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्यावर डांबर टाकण्याचा विसर पडला की काय, असा सवाल वाहनधारक उपस्थित करू लागले आहेत.
सदर रस्त्यावर तत्काळ दुरुस्ती काम सुरू करण्यात यावे अन्यथा दि. १ मार्चपासून रास्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशारा उपसरपंच जिजाबाई गोविंद, अर्जुन बोरसे, विजय शिरसाठ, पंढरीनाथ पाटील, एकनाथ भुसार, नितीन बोरसे, अशोक बोरसे, संतोष देसाई, राजेंद्र जाधव,
कैलास महाले, राकेश गोविंद, काशीनाथ बोरसे, योगेश जाधव, संदीप शेवाळे, प्रशांत हनुमंते, किरण
बोरसे, केदा वाघ, भाऊसाहेब जाधव, प्रकाश महाले, उत्तम राजभोज,
साई सोनवणे यांनी दिला आहे. (वार्ताहर)