अल्पवयीन मेहुणी, मुलीचे पतीकडून अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:18 AM2021-08-14T04:18:00+5:302021-08-14T04:18:00+5:30
सिन्नर : पत्नीसोबत फारकत झाल्यानंतर तीन वर्षांच्या मुलीला कपडे घेऊन देण्याच्या बहाण्याने स्वत:च्या तीन अल्पवयीन मुलींसह सतरा वर्षांच्या ...
सिन्नर : पत्नीसोबत फारकत झाल्यानंतर तीन वर्षांच्या मुलीला कपडे घेऊन देण्याच्या बहाण्याने स्वत:च्या तीन अल्पवयीन मुलींसह सतरा वर्षांच्या अल्पवयीन मेहुणीचे अपहरण केल्याची घटना येथील उद्योग भवन परिसरातील कर्पेनगर भागात घडली. याबाबत सासूने सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संशयित सुरेश दगडू आठवे (रा. परभणी, ह.मु. कानडी मळा, सिन्नर) याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कानडी मळ्यात राहणाऱ्या सुरेश आठवे व त्याच्या पत्नीची काही महिन्यांपूर्वी फारकत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. कर्पेनगर भागात आई-वडिलांकडे राहणाऱ्या फारकत झालेल्या पत्नीकडे असलेल्या तीन वर्षांच्या मुलीला कपडे घेऊन द्यायचे असल्याचा बहाणा करून संशयित तेथे आला. यावेळी तीन वर्षांच्या मुलीसह सतरावर्षीय अल्पवयीन मेहुणीलाही फूस लावून त्याने पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी सिन्नर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासचक्रे फिरविली आहेत. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजय माळी पुढील तपास करीत आहेत.