पूर्व प्रभाग सभापतिपदी मिर्झा
By admin | Published: May 21, 2017 01:29 AM2017-05-21T01:29:44+5:302017-05-21T01:29:53+5:30
शनिवारी (दि. २0) झालेल्या प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा एकमेव अर्ज असल्याने पूर्व प्रभाग सभापतिपदी शाहीन मिर्झा यांची निवड झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने भाजपाचाच सभापती होणार हे निश्चित झाले होते. शनिवारी (दि. २0) झालेल्या प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा एकमेव अर्ज असल्याने पूर्व प्रभाग सभापतिपदी शाहीन मिर्झा यांची बिनविरोध निवड झाली.
मनपा पूर्व विभाग सभापतिपदाची निवडणूक शनिवारी (दि.२0) दुपारी ४ वाजता प्रभाग सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अपर आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगरसचिव अशोक वाघ, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. पूर्व विभागात पाच प्रभाग असून, यात प्रभाग १४, १५, १६, २३ व ३0 यांचा समावेश आहे. या पाच प्रभागातील १९ नगरसेवकांमध्ये भाजपाचे १२, राष्ट्रवादी ४, काँग्रेस २ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाचे नगरसेवकामध्ये सतीश कुलकर्णी, सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, सुप्रिया खोडे, श्याम बडोदे, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा, उपमहापौर प्रथमेश गिते, सुमन भालेराव, अनिल ताजनपुरे, अर्चना थोरात आदिंचा समावेश आहे. भाजपाकडून नवीन चेहऱ्यापैकी प्रथमेश गिते यांना उपमहापौर व श्याम बडोदे यांना स्थायी समितीवर संधी देण्यात आली. त्यामुळे सभापतीपदासाठी शाहीन मिर्झा यांना संधी देण्यात आली. शाहीन मिर्झा यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक अधिकारी जोतिबा पाटील यांनी मिर्झा यांची पूर्व प्रभाग सभापतिपदी बिनविरोध निवड घोषित केली. यावेळी महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते मिर्झा यांचा सत्कार करण्यात आला.