सिटूच्या त्रैवार्षिक अधिवेशनात विविध निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:01 AM2019-11-17T00:01:16+5:302019-11-17T00:02:29+5:30
कामगार व जनतेची फसवणूक करून फसव्या राष्ट्रवादामुळे भाजपसारखे चुकीचे सरकार निवडून येत आहेत. ही फसवणूक जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र करून आगामी काळात सिटू जनतेचे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष करणार आहे.
सातपूर : कामगार व जनतेची फसवणूक करून फसव्या राष्ट्रवादामुळे भाजपसारखे चुकीचे सरकार निवडून येत आहेत. ही फसवणूक जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र करून आगामी काळात सिटू जनतेचे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष करणार आहे. या संघर्षाची सुरु वात दि.८ जानेवारीला देशव्यापी संपाने होणार असल्याचे सिटूचे प्रदेश सरचिटणीस एम. एच. शेख यांनी जाहीर केले.
सिटू भवन येथील कॉ. दिलीप पाटीलनगर येथे आयोजित सिटूच्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. शेख यांनी पुढे सांगितले की, मागील पाच वर्षांच्या काळात केंद्रातील भाजप सरकारने लाखो नोकऱ्या दिल्याचे सांगितले. प्रत्यक्षात लाखो कामगारांना बेरोजगार केले आहे. ही वस्तुस्थिती आहे. देशात साम्राज्यवाद वाढत आहे. मोदी सरकारकडून खोटा राष्ट्रवादाचा डांगोरा पिटविला जात आहे. खरे तर कामगार वर्गच खरा राष्ट्रवादी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सिटूचे उपाध्यक्ष सईद अहमद यांनीही मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानी सिटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे होते. व्यासपीठावर श्रीधर देशपांडे, भिवाजी भावले, अॅड. वसुधा कराड, संतोष गांगुर्डे, बी. टी. भामरे, योगेश अहिरे, देवीदास आडोळे, सिंधू शार्दूल, भागवत डुंबरे, संतोष काकडे, हिरामण तेलोरे, हरिभाऊ तांबे, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार, संतोष कुलकर्णी, हर्षल नाईक, कल्पना शिंदे आदी उपस्थित होते.
जानेवारीत देशव्यापी संप पुकारणार
समारोपाच्या भाषणात सिटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले की, सद्यस्थितीतील अर्थव्यवस्था, जातीय व्यवस्था, धर्माचा प्रभाव, साम्राज्यवाद यावर निवडणुका जिंकल्या जात आहेत. या सर्व व्यवस्था संपविण्यासाठी संघटनेची पुनर्बांधणी करावी लागेल. त्यासाठी कामगारांना प्रशिक्षित करण्यासाठी धोरण आखले जाईल. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दि. ८ जानेवारी रोजी पुकारण्यात येणाºया संपात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.