महिला बालकल्याणच्या निधीत गैरव्यवहार सीमंतिनी कोकाटे : कुपोषित बालकांची नावे लपविली जातात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:47 AM2018-04-07T00:47:27+5:302018-04-07T00:47:27+5:30
सिन्नर : शिवसरस्वती फाउण्डेशनच्या वतीने तालुकाभर कुपोषणावर काम सुरू असून, प्रशासनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही.
सिन्नर : शिवसरस्वती फाउण्डेशनच्या वतीने तालुकाभर कुपोषणावर काम सुरू असून, प्रशासनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. त्याचबरोबर अनेक अंगणवाड्यांवर अतिशय धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. प्रशासनाचा या सर्व बाबींकडे काणाडोळा होत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केला आहे. तीव्र कुपोषित मुलांची नावे लपविली जात असल्याचे कोकाटे यांनी सांगितले़ यासंदर्भात संस्थेच्या अध्यक्ष सीमंतिनी माणिकराव कोकाटे यांनी गटविकास अधिकारी एन. के. वाणी यांची भेट घेऊन अनेक बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. दत्तक घेतलेल्या ६७ मुलांपैकी १८ मुले कुपोषणातून बाहेर आली असून, सॅममधील १३ मुलांपैकी ४ मुले मॅममध्ये, तर तिघांना दुर्धर आजार असल्याचे समोर आले. उन्हाळ्यात मुलांची योग्य ती काळजी न घेतली जात असल्याने अडचणी येत आहेत. या संदर्भात कोकाटे यांनी पंचायत समितीत गटविकास अधिकारी यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. महिला बालकल्याण विभागावर मोठ्या प्रमाणावर खर्च होणारा निधीत जर अशा प्रकारे गैरव्यवहार होत असेल तर प्रशासनाला कुणाची कवच कुंडले आहेत, असा सवाल उपस्थित करत कोकाटे यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारावर बोट ठेवले.
यावेळी दालनात सीमंतिनी कोकाटे यांच्यासोबत बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ, योगेश घोटेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी लता गवळी, पर्यवेक्षक अनुराधा राऊत, एफ. के. बढे, एस.बी. शिंदे, वैद्यकीय अधिकारी सौ. गाढे आदी उपस्थित होते.