भूखंडावरील करवाढीवरून संभ्रम निर्माण केला जातो - तुकाराम मुंढे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 04:16 PM2018-08-30T16:16:23+5:302018-08-30T23:01:01+5:30
नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिक मध्ये केलेली दरवाढ मोठ्या प्रमाणात मागे घेतली असून मोकळ्या भूखंडावर पूर्वी 03 पैशावरून 40 पैसे दर केले होते ते आता 03 पैसे करण्यात आले आहे.
नाशिक- नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिक मध्ये केलेली दरवाढ मोठ्या प्रमाणात मागे घेतली असून मोकळ्या भूखंडावर पूर्वी 03 पैशावरून 40 पैसे दर केले होते ते आता 03 पैसे करण्यात आले आहे. त्यामुळं शेतीसह कोणत्याही मोकळ्या भूखंडवर आता करवाढ नसेल शैक्षणिक संस्थांना व्यवसायिक ऐवजी निवासी दर लागू केले आहेत.
करवाढीचा बोजा लादल्याने टीकेचे धनी ठरलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेत मोकळ्या भूखंडावरील करवाढ पूर्णत: रद्द केली आहे. तर नवीन वार्षिक भाडे मूल्य आकारताना जी दुप्पट, तिप्पट वाढ केली होती ती सरासरी पन्नास टक्क्यांनी मागे घेतली आहे.
गुरुवारी महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांनी आपल्या 31 मार्च रोजीच्या अधिसूचनेत शुद्धिपत्रक काढण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ही दरवाढ कमी केल्याचे नमूद केले. महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरचही ही दरवाढ मागे घेण्यात आली आहे.