‘मिसळ’ची सरमिसळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:57 AM2017-12-17T01:57:06+5:302017-12-17T02:00:07+5:30
राजकारणी असले म्हणून काय झाले, राजकारणेतर मित्रत्व असू शकत नाही का? त्यातूनच कुठे मिसळ पार्टी आयोजिली गेली असेल व तिथे केले असेल प्रत्येकाने मनमोकळे तर त्याला राजकारण म्हणून काय बघायचे? पण हल्ली तसे होत नाही कारण तत्त्व, निष्ठा कितीही गुंडाळून ठेवल्या गेल्या असल्या तरी, राजकारणातील अभिनिवेश सुटता सुटत नाहीत. संबंधितांचे वर्तनच तसे घडून येताना दिसते. नाशकातील खासगी ‘मिसळ’ पार्टीची चर्चाचर्वण होणे त्यामुळेच स्वाभाविक ठरून गेले आहे.
साराश
किरण अग्रवाल
राजकारणी असले म्हणून काय झाले, राजकारणेतर मित्रत्व असू शकत नाही का? त्यातूनच कुठे मिसळ पार्टी आयोजिली गेली असेल व तिथे केले असेल प्रत्येकाने मनमोकळे तर त्याला राजकारण म्हणून काय बघायचे? पण हल्ली तसे होत नाही कारण तत्त्व, निष्ठा कितीही गुंडाळून ठेवल्या गेल्या असल्या तरी, राजकारणातील अभिनिवेश सुटता सुटत नाहीत. संबंधितांचे वर्तनच तसे घडून येताना दिसते. नाशकातील खासगी ‘मिसळ’ पार्टीची चर्चाचर्वण होणे त्यामुळेच स्वाभाविक ठरून गेले आहे.
शिवसेनेतून भाजपा व्हाया राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करून आलेल्या सुनील बागुल यांनी आपल्या मूळ पक्षातील तत्कालीन सवंगड्यांना दिलेल्या मिसळ पार्टीला खरे तर दिंडोरीतील त्यांच्या एका नव्या उद्योगाच्या शुभारंभाचे निमित्त होते, पण त्याखेरीजचे संदर्भ लावून ही पार्टी वेगवेगळ्या शक्यतांना जन्म घालणारी ठरली. कारण, एरव्ही एकमेकांना न भेटणारे मूळ राजकीय प्रवाहाबाहेरचे सारे सहकारी यानिमित्ताने एकवटले होते. यात शिवसेनेबाहेर पडून सध्या दुसºया पक्षात असलेले जसे होते तसेच शिवसेनेत कायम असलेलेही होते. फरक इतकाच की ते विद्यमान पक्षाधारींबरोबर जमवून न घेऊ शकलेले व परिणामी पक्षात राहूनही जणू अडगळीत पडलेलेच आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक पक्ष नेतृत्वाबद्दलच्या चर्चेचा तडका या मिसळ पार्टीत लाभून गेला. अर्थात, शिवसेनेत अडगळीत पडल्याची व्यथा मनी बाळगणाºयांबरोबरच अन्य पक्षात जाऊनही अडगळीत पडून असलेलेच या निमित्ताने एकत्र आलेले दिसून आले, त्यामुळेही या तडक्याचा खमंगपणा लक्षवेधी ठरून गेला म्हणायचे. बागुल भाजपात भलेही प्रदेश उपाध्यक्षपदी आहेत, पण अनेक उपाध्यक्षांच्या गर्दीत त्यांना तेथे अपेक्षित सन्मान लाभणे शक्य नाही. शिवाय भाजपाचे संस्कार पचविणे हे तितकेसे सहज नक्कीच नाही. अलीकडच्या काळात भाजपाचेही काँग्रेसीकरण होत चालले आहे हा भाग वेगळा, परंतु तेथील ‘चिंतकां’ची यासंदर्भातील सद्दी अजून संपलेली नाही. परिणामी पर पक्षातून आलेल्या बागुल यांच्याकडे तसे त्रयस्थतेनेच पाहिले जाते. शिवसेनेत टिकून असलेले दत्ता गायकवाड, जयंत दिंडे यांची अवस्थाही वेगळी नाही. एकेकाळी पक्षासाठी खस्ता खाल्लेले हे नेते आज स्वपक्षात दुर्लक्षिले गेले आहेत. विनायक पांडे स्वभावत: शिवसैनिक असले तरी मध्यंतरीच्या काळात त्यांनीही धरसोडीचे राजकारण केले, त्यामुळे तेही बाजूला पडल्यासारखे आहेत. अशा पार्श्वभूमीवर या साºयांची मांदियाळी जमून आल्यानेच ती चर्चेत ठरली. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांची पार्श्वभूमी त्यास असेलही, परंतु या साºयांचे अराजकीय मैत्र हा कौतुकाचा विषय न ठरता त्यांच्या एकत्रिकरणातून निरनिराळे अर्थ काढले जातात तेव्हा संबंधितांची व त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दलची विश्वासार्हताही पणास लागते आणि तोच यातील खरा मुद्दा आहे. कारण मिसळ पार्टीच्या निमित्ताने राजकीय सरमिसळ झालेल्यांची ‘मन की बात’ वेगळीच असली आणि पूर्वीचे दिन आता राहिले नाहीत, असाच त्यामागील समान धागा राहिल्याचे पाहता, त्यातून तसाच अर्थ प्रसृत होणे व विश्वसार्हतेचीही चर्चा घडून येणे क्रमप्राप्त ठरते.