गहाळ झालेले ३ लाख ७० हजारांचे दागिने केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 08:36 PM2021-01-16T20:36:34+5:302021-01-17T00:49:11+5:30
सिन्नर : मुंबईत मंत्रालयासमोरील कफ परेड पोलीस ठाण्याचे अंमलदार दशरथ अर्जुन आव्हाड यांनी झुलेलाल मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकाचे ७ तोळे ७ ग्रॅम वजनाचे (किंमत ३ लाख ७५ हजार रुपये) सोन्याचे कडे शोधून परत करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आव्हाड हे सिन्नर तालुक्यातील ठाणगावचे भूमिपुत्र आहे.

कफ परेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिंधी बांधवांचे झुलेलाल मंदिर असून मंदिरात लोरी (होळीसारखा) सण साजरा करण्यात आला. रात्री साडेदहाच्या सुमारास कुलाबा येथील व्यापारी गौतम सिंह मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिरासमोर श्रीफळ वाढवून दर्शन घेतल्यानंतर ते घरी परतले. मात्र हातातील मौल्यवान सोन्याचे कडे नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांची भंबेरी उडाली. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गौतम पुन्हा झुलेलाल मंदिरात शोध घेण्यासाठी आले. परंतु सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वार कुलूप लावून बंद केले होते. कफपरेड पोलीस ठाण्याचे अंमलदार आव्हाड गस्त घालत असताना त्यांच्याकडे गौतम यांनी मदत मागितली असता. प्रवेशद्वार बंद असल्याने आव्हाड यांनी १४ फूट उंच भिंतीवरून चढून सुरक्षारक्षकांना बोलावून शोधकार्य हाती घेतले. पहाटे पावणेदोनच्या सुमारास आव्हाड यांना होळीच्या राखेत सोन्याचे कडे सापडले. पोलीस नाईक आंधळे आणि पोलीस शिपाई महानोर घटनास्थळी दाखल झाले होते. गहाळ झालेले ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कडे परत मिळाल्याने गौतम यांच्या जीवात जीव आला. गौतम यांनी रात्रपाळीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपवते यांना भेटून आव्हाड यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले.