बेपत्ता अभियंता पाटील अखेर सुखरूप घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:09 AM2018-06-02T01:09:11+5:302018-06-02T01:09:11+5:30

महापालिकेतील अतिकामाच्या तणावामुळे जात असल्याची चठ्ठी लिहून गत सहा दिवसांपासून बेपत्ता असलेले नगररचना विभागातील बेपत्ता सहायक अभियंता रवींद्र पाटील यांचा शोध घेण्यास शहर पोलिसांना यश आले़ तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट परिसरात त्यांचा शोध घेऊन शुक्रवारी (दि़१) सकाळी नाशिकला आणल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले़

 The missing engineer Patil finally came home safely | बेपत्ता अभियंता पाटील अखेर सुखरूप घरी

बेपत्ता अभियंता पाटील अखेर सुखरूप घरी

Next

नाशिक : महापालिकेतील अतिकामाच्या तणावामुळे जात असल्याची चठ्ठी लिहून गत सहा दिवसांपासून बेपत्ता असलेले नगररचना विभागातील बेपत्ता सहायक अभियंता रवींद्र पाटील यांचा शोध घेण्यास शहर पोलिसांना यश आले़ तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट परिसरात त्यांचा शोध घेऊन शुक्रवारी (दि़१) सकाळी नाशिकला आणल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले़ त्यामुळे साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, या कालावधीत पाटील हे कुठे होते याबाबतचे गूढ कायम असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत़  सहायक अभियंता रवींद्र पाटील हे गत शनिवार (दि़२६ मे) पासून बेपत्ता झाले होते़ बेपत्तापूर्वी अतिकामाच्या त्रासामुळे जात असून शोध घेऊ नये, अशी चिट्ठी लिहिल्याने खळबळ उडाली होती. गेल्या शनिवारी नाशिकरोड येथे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वॉक विथ कमिशनर कार्यक्रमाला जात असल्याचे सांगून सकाळी ते बाहेर पडले.  दरम्यान त्यांच्या पत्नीला घराबाहेरच कार दिसल्याने त्यांनी आश्चर्याने शोध घेतला असता, मोटारीत त्यांचे पाकीट, मोबाईल आणि चिठ्ठी सापडली होती. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांनी गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पाटील बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर गत सहा दिवसांपासून पोलिसांकडून पाटील यांचा शोध सुरू होता.
गंगापूर पोलिसांनी त्यांच्या कारची तपासणी करून शोध घेण्याचा प्रयत्नही केला, मात्र यश आले नाही़ यानंतर पाटील यांच्या शोधासाठी मध्य प्रदेश व गुजरात राज्यात पोलीस पथके पाठविण्यात आली होती़ ग्रीन फिल्ड लॉन्सवरील कारवाईमुळे महापालिका प्रशासनाला उच्च न्यायालयाने धारेवर धरले होते. न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही, अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली होती. त्याच तणावातून रवींद्र पाटील घराबाहेर गेल्याची चर्चा होती. पाटील यांचा मोबाइलही घरीच असल्याने त्यांचा शोध घेणे अवघड झाले होते़ त्यातच, पाटील यांचा ईमेल आयडी पुण्यातील एका सायबर कॅफेतून वापरण्यात आल्याचे पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषण शाखेच्या लक्षात आले. सायबर कॅफेवरील नोंद व ईमेलवरील आयपी अ‍ॅड्रेसनुसार गंगापूर पोलिसांच्या एका पथकाने स्वारगेट परिसरातून पाटील यांचा शोध लावला़ तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुण्यातील शनिवारवाडा परिसरातून त्यांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. यानंतर शुक्रवारी पहाटे पोलिसांच्या एका पथकाने रवींद्र पाटील यांना सोबत घेऊन नाशिक गाठले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे स्वाधीन केले़
सकाळी ते घरी पोहोचले अन्
रवि पाटील हे सकाळी सहा वाजेच्या सुमारास घरी पोहोचले. त्यांच्या साडूंनी याबाबत अनेकांना एसएमएस केले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. रविंद्र पाटील यांचे चुलत बंधू नाशिक महापालिकेच्या सेवेत असून त्यांनी सकाळीच महापालिकेच्या अभियंत्याच्या व्हॉटस अ‍ॅप ग्रुपवरही याबाबत माहिती टाकली होती.
पाटील बोलण्याच्या मन:स्थितीत नाहीत
 रवींद्र पाटील घरी सुखरूप आल्यानंतर दिवसभर त्यांना भेटण्यासाठी रीघ लागली होती. महापालिकेचे अभियंता, तसेच पाटील यांचे आप्तेष्ट आणि मित्र परिवार यांनी भेट दिली. माध्यमांशी बोलण्यास पाटील यांनी नकार दिला. आपली मन:स्थिती ठिक नसल्याचे त्यांनी सांगितले.
मनपा पाटील यांची चौकशी करणार
दरम्यान, अभियंता रवींद्र पाटील हे न सांगता कामावर गैरहजर असल्याने त्यांची औपचारिक चौकशी होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. पाटील यांच्यावरील कामाच्या तणाबाबतदेखील चौकशी केली जाणार आहे.
पाटील यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ काय?
मनपाचे अभियंता रवींद्र पाटील हे बेपत्ता झाले असले तरी त्यांच्यावर महापालिका बाह्य कोणी दबाव टाकला होता काय किंवा अन्य अनेक प्रकारचे प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत. पाटील यांची कृती कोणाच्या सांगण्यावरून होती काय याचाही शोध घेतला जात आहे.
कोठे होते पाटील?
नाशिकसोडून निघून गेल्यानंतर पाटील कोठे होते याबाबत अनेक चर्चा होत आहेत. दत्तगुरूंचे भक्त असलेल्या पाटील यांनी सुरूवातीला सोलापूर आणि नंतर अक्कलकोट गाठले. त्यानंतर ते पुण्यास आले होते, असे सांगितले जाते. त्यानंतर त्यांचा शोध लागल्यानंतर त्यांना पुण्याहून नाशिकला पोलिसांनी आणले.
महापौर रंजना भानसी यांनी पाटील यांच्या घरी भेट दिली व ते परतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. एक पालक आणि मोठी बहीण या नात्याने रवींद्र यांनी परत यावे, असे आवाहन आपण केले होते त्याला प्रतिसाद देऊन ते परत आले आहेत. आता पाटील यांच्या पाठीशी आपण असू, असे त्यांना सांगितल्याचे पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या.

Web Title:  The missing engineer Patil finally came home safely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.