बेपत्ता अधिकारी आजारी असल्याचे झाले स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:19 AM2018-11-15T00:19:14+5:302018-11-15T00:19:34+5:30
महापालिकेच्या नगररचना विभागाचे टीडीआर आणि रोखीतील मोबदला प्रकरण गाजत असतानाच सहायक संचालक सुरेश निकुंभे हे अचानक दोन दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागाचे टीडीआर आणि रोखीतील मोबदला प्रकरण गाजत असतानाच सहायक संचालक सुरेश निकुंभे हे अचानक दोन दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. मात्र, अखेरीस बुधवारी (दि.१४) ते मुंबईस असून, आजारी पडल्याने रुग्णालयात दाखल असल्याचे स्पष्ट झाले.
महापालिकेच्या विकास आराखड्यात गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवर जवळ सर्व्हे नंबर ७०५ मध्ये क्रीडांगणासाठी आरक्षित भूखंडाच्या मोबदल्यासाठी २० कोटी रुपये देण्यात येणार असून, त्यास पदाधिकाऱ्यांकडून विरोध सुरू होत आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबरोबरच नगरचना विभागाचे सहायक संचालक सुरेश निकुंभे लक्ष्य ठरले होते. त्याचबरोबर देवळाली शिवारात सर्व्हे नं. २९५ मध्ये रेडीरेकनरचे दर साडेसात हजार रुपये असताना प्रत्यक्षात मात्र मालकास २४ हजार रुपयांचा टीडीआर देण्यात आल्याचे प्रकरण सभागृह नेता दिनकर पाटील यांनी उघड केले.
दरम्यान, आयुक्त मुंढे यांनीदेखील निकुंभे यांना धारेवर धरल्याची चर्चा पसरली होती. त्यातच दिवाळी सुटीनंतर तीन दिवस निकुंभे महापालिकेत उपलब्ध तर नाहीच शिवाय त्यांचा संपर्क होत नव्हता मात्र त्यांचे रजेसंदर्भात पत्र प्राप्त झाले असून, सध्या रुग्णालयात दाखल असल्याने ते कामावर येऊ शकत नाहीत, असे कळविल्याने प्रशासन विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला.