मिशन झिरो नाशिकला पुन्हा प्रारंभ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:14 AM2021-05-15T04:14:54+5:302021-05-15T04:14:54+5:30
नाशिक : नागरिकांची लसीकरणापूर्वी अँटीजेन किंवा आर टी पी सी आर चाचणी होऊन त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना हुडकून त्यांना आवश्यक ...
नाशिक : नागरिकांची लसीकरणापूर्वी अँटीजेन किंवा आर टी पी सी आर चाचणी होऊन त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना हुडकून त्यांना आवश्यक सल्ला व उपचार उपलब्ध करून देणे व निगेटिव्ह व्यक्तींचेच लसीकरण व्हावे या संकल्पनेद्वारे मिशन झिरो व मिशन लसीकरण हे अभियान राबविण्यास पंचवटीपासून प्रारंभ करण्यात आला आहे.
नाशिक महानगर पालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व नाशिक वॉरियर्स या संस्थांद्वारे त्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यायोगे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्क्रिनिंग होणार असून त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध होतील व गर्दीत होणारे संक्रमण थांबेल. तसेच उर्वरित नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला बळकटी मिळणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील गरज लक्षात घेऊन समाजसेवक, बी जे एस संस्थापक शांतिलाल मुथा यांच्या संकल्पनेतून देशभर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन च्या माध्यमातून बीजेएस मिशन ऑक्सिजन बँक कार्यरत आहे. तसेच बी जे एस, वॉटर ग्रेस व नाशिक वॉरियर्स या स्वयंसेवी संस्था पुन्हा कार्यरत झाल्या असून महानगर पालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार मिशन झिरो नाशिक व मिशन लसीकरण हे अभियान सुरु करण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मिशन झिरो व मिशन लसीकरण मोहिमेचे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला, दीपक चोपडा, वॉटर ग्रेसचे चेतन बोरा, नाशिक वॉरियर्सचे रामेश्वर मालानी, विनोद गणेरीवाल, बीजेएसचे ललित सुराणा, अभय ब्रम्हेचा, अमित बोरा, गोटू चोरडिया, गौतम हिरन, रवींद्र चोपडा, रोशन टाटीया, किरण धनराय हे झटत आहेत.
इन्फो
पुढील टप्प्यात सर्व विभागात अभियान
नाशिकच्या सहाही विभागातील सर्व लसीकरण केंद्रांजवळ महानगर पालिकेच्या वतीने व या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मिशन झिरो हे अभियान सुरु होणार आहे. या ठिकाणी लसीकरणा व्यतिरिक्त ही नागरिक येऊन अँटीजेन चाचणी करून घेऊ शकतात व त्यायोगे मनातील भीती दूर होण्यास मदतच होईल व आवश्यकता असल्यास सल्ला व उपचार घेऊ शकतात त्यामुळे पुढील संक्रमण रोखण्यास हातभार लागेल.