‘मिस्तुरा’ने रविवार झाला रंगतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:26 AM2018-12-24T00:26:16+5:302018-12-24T00:26:54+5:30

गोदाकाठी रविवार (दि.२३)ची संध्याकाळ नाशिककरांनी आनंदात घालवली. तरुणाईने सजविलेल्या ‘मिस्तुरा’ कलामहोत्सवाला अखेरच्या दिवशी भेट देत शेकडो नागरिक येथील कलाकृतींच्या प्रेमात पडल्याचे चित्र पहावयास मिळाले.

 'Mistura' became the colorful Sunday | ‘मिस्तुरा’ने रविवार झाला रंगतदार

‘मिस्तुरा’ने रविवार झाला रंगतदार

Next

नाशिक : गोदाकाठी रविवार (दि.२३)ची संध्याकाळ नाशिककरांनी आनंदात घालवली. तरुणाईने सजविलेल्या ‘मिस्तुरा’ कलामहोत्सवाला अखेरच्या दिवशी भेट देत शेकडो नागरिक येथील कलाकृतींच्या प्रेमात पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. नावीन्यपूर्ण कल्पनेतून टाकाऊ वस्तूंचा लीलया वापर करत साकारलेल्या कलाकृतींसोबत तरुणाईने ‘सेल्फी’ घेत धमाल केली.  शौर्य फाउंडेशनच्या वतीने गोदापार्क येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही विविध कलांचे मिश्रण ‘मिस्तुरा’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी रात्री या महोत्सवाचा समारोप करण्यात आला. शनिवारपासून सुरू असलेल्या या महोत्सवानिमित्त गोदापार्क परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. ‘बेस्ट आऊट आॅफ वेस्ट’ ही संकल्पना घेऊन दोनदिवसीय मिस्तुरा महोत्सव तरुणाईने रंगविला.
युवा कलाकारांच्या कलेला व्यासपीठ मिळावे आणि प्रतिभावंत कलावंत उदयास यावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. रविवारी या महोत्सवाचा अखेरचा दिवस असल्याने संध्याकाळी साडेपाच वाजेपासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत तरुणाईसह अबालवृध्दांची येथे गर्दी झाली होती. ललित कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेले महोत्सवाचे आकर्षक प्रवेशद्वाराने नाशिककरांचे स्वागत करत लक्ष वेधून घेतले.
सोशल मीडियाची ‘क्रेझ’ तरुणाईमध्ये असल्यामुळे युवावर्गाने या महोत्सवाला मोठ्या संख्येने भेटी देत येथील कलाकृतींसोबत सेल्फी क्लिक करून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामवर यासंबंधीच्या पोस्ट केल्या.
कव्वालीची बहारदार मैफल
या महोत्सवात ‘कारवा’ ग्रुपच्या वतीने कव्वालीची मैफल रंगली. उर्दू भाषेवर विशेष प्रेम करणाऱ्या तरुणाईच्या या ग्रुपने उर्दूच्या गोडव्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.मुख्य गायक तन्मय उन्हवणे यांनी नुसरत फ तेअली खान यांचा ‘सादगी तो हमारी किजीये..., मेरे रश्क-ए-कमर, दमा दम मस्त कलंदर, आफ्रीन-आफ्रीन या कव्वाली सादर केल्या. त्याला गौरव गुंजाळ (तबला), ऋ तुजा काळे (संवादिनी), अरविंद नायडू, अजय भालेराव, विश्वरूप (कोरस) यांनी साथसंगत केली.
‘रुद्रतांडव’ने वेधले लक्ष
समारोपप्रसंगी तालरुद्रच्या ढोल-ताशा पथकाने ‘रुद्रतांडव’ नावाचे फ्युजन सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यामध्ये शंकरा, वृंदावनी सारंग, अहिरभैरव आदी राग सातमात्रा, साडेनऊ मात्रांमधून ढोलपथकाने सादर केले. भारतीय तसेच पाश्चात्त्य लोकवाद्याचा आधार घेतला गेला. या कार्यक्रमाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच या कार्यक्रमानंतर ‘फॅशन शो’चे सादरीकरण करण्यात आले.

Web Title:  'Mistura' became the colorful Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक