बदलीसाठी आमदाराची दिशाभूल
By admin | Published: September 26, 2015 10:19 PM2015-09-26T22:19:52+5:302015-09-26T22:21:09+5:30
नाशिक बाजार समिती : लेखापरीक्षक हटविण्यासाठी अट्टहास
नाशिक : बाजार समितीचे लेखापरीक्षण करून तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहाराचे वाभाडे काढल्याचा राग मनात धरून विद्यमान पदाधिकाऱ्याने शहरातील एका सत्ताधारी आमदाराची दिशाभूल करून लेखा परीक्षकांच्या बदलीचे प्रयत्न चालविल्याची बाब सहकार क्षेत्रात चर्चेची ठरली आहे. बाजार समितीतील काही व्यापाऱ्यांनी सदर आमदाराच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिल्यानंतर सहकारमंत्र्यांकडे केली जाणारी लेखा परीक्षकांची तक्रार वाटेतच अडविण्यात आली आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहाराची खुली चर्चा यापूर्वीही लेखा परीक्षणाच्या माध्यमातून उजागर झाली असून, नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही विद्यमान पदाधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचे खुले आरोप करण्यात आले. सन २०१३-१४ या कालावधीत बाजार समितीचे गाळे प्रकरण, सहकार बॅँकेचे कर्ज परतफेड या साऱ्या बाबींमध्ये बाजार समिती ६३ कोटी, ५४ लाख, ४७ हजार रुपयांच्या आर्थिक नुकसानीचा ठपकाही तत्कालीन सभापती देवीदास पिंगळे, उपसभापती दिलीप थेटे, सचिव खकाळे, काळे व लेखापाल जैन यांच्यावर ठेवण्यात आला होता. शासनाने नेमलेले विशेष लेखा परीक्षक पिंगळे व गाधेकर यांनीच हा सारा प्रकार उघडकीस आणल्याचा राग मनात धरून त्यांच्या बदलीसाठी बाजार समितीच्या एका विद्यमान पदाधिकाऱ्याने चार दिवसांपूर्वी शहरातील भाजपाच्या एका लोकप्रतिनिधीकडून सहकार-मंत्र्यांच्या नावे पत्र मागितले, परंतु असे पत्र मागण्यामागचे कारण विषद केले नाही. भाजपाच्या या लोकप्रतिनिधीने विद्यमान पदाधिकाऱ्यावर विश्वास ठेवून कोरे पत्र त्याच्या हाती सोपविल्यानंतर या पत्राच्या आधारे बाजार समितीचा गैरव्यवहार शोधून काढणाऱ्या विशेष लेखा परीक्षकांची बदली करण्याचा डाव या विद्यमान पदाधिकाऱ्याने आखला. परंतु त्याची कुणकुण बाजारसमितीतील काही व्यापारी व सहकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांना लागताच त्यांनी भाजप आमदाराच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यानच सहकारमंत्र्यांची भेट घेऊन आमदाराच्या नावे पत्र देण्याचा विद्यमान पदाधिकाऱ्याने ठरविलेले असताना, त्याच वेळी सदर आमदारानेही सहकारमंत्र्यांशी संपर्क साधत त्या पत्राची दखल न घेण्याची विनंती केली. विद्यमान पदाधिकाऱ्याकडून केल्या जाणाऱ्या या दिशाभुलीबाबत आमदाराने जाब विचारला असता, त्यावर सारवासारव करण्यात आली; मात्र बाजार समितीच्या आवारात या पत्राचे बिंग फूटून विद्यमान पदाधिकाऱ्याचे हसे झाले. (प्रतिनिधी)