अंध-अपंगांसाठीच्या लिफ्टचा गैरवापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 01:56 AM2019-08-26T01:56:42+5:302019-08-26T01:57:10+5:30
दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालयाच्या गच्चीवर बसविण्यात येणारे सोलरचे साहित्य अंध-अपंगांसाठी असलेल्या लिफ्टमधून वाहून नेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नाशिकरोड : दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालयाच्या गच्चीवर बसविण्यात येणारे सोलरचे साहित्य अंध-अपंगांसाठी असलेल्या लिफ्टमधून वाहून नेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालय इमारतीच्या गच्चीवर सोलर बसविण्यात कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मनपा विभागीय कार्यालयाच्या इमारतीला अंध-अपंगांच्या निधीतून लावण्यात आलेल्या लिफ्टमधून शुक्रवारी सोलरचे साहित्य, लोखंडी-अॅल्युमिनियमच्या प्लेटा, अॅँगल आदी साहित्य वाहून गच्चीवर नेण्यात येत होते. सदर लिफ्ट अंध-अपंगांसाठी प्राधान्याने वापरण्यासाठी आहे. मात्र त्यामधून सोलरचे साहित्य वाहून नेण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शुक्रवारी दुपारी नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक आटोपल्यानंतर नगरसेवक प्रशांत दिवे यांना सदर बाब लक्षात येताच त्यांनी संबंधित अधिकारी व साहित्य वाहून नेणाऱ्या कामगारांना चांगलेच धारेवर धरले. सदर लिफ्ट खराब अथवा नादुरूस्त झाल्यास लागलीच रिपेअर करून देणार का असा प्रश्न दिवे यांनी उपस्थित केल्यानंतर लिफ्टमधून गच्चीवर वाहून नेण्यात येणारे सोलरचे साहित्य बाहेर काढण्यात आले.