मिसळबरोबरच साग्रसंगीत पार्ट्यांना ऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:43 AM2019-09-24T01:43:04+5:302019-09-24T01:43:24+5:30
नाशिक : विधानसभा निवडणुकीची चाहुल लागल्यानंतरच सुरू झालेल्या कार्यकर्त्यांच्या मिसळ ते पार्ट्याने ऊत आला असून, सायंकाळनंतर हॉटेल्सला गर्दी होऊ ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीची चाहुल लागल्यानंतरच सुरू झालेल्या कार्यकर्त्यांच्या मिसळ ते पार्ट्याने ऊत आला असून, सायंकाळनंतर हॉटेल्सला गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे.
विधानसभा निवडणुका आता जाहीर झाल्या असल्या तरी या अशा निवडणुकांसाठी इच्छुकांना अगोदरच तयारी करावी लागते. यादृष्टीने अनेक पक्षातील इच्छुकांनी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून तयारी सुरू केली होती. नाशिक शहरात अनेक विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी निवडणुकीची तयारी करताना वाढदिवस आणि निधनाची घटना चुकवली नाही. अशा कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावून संबंधितांशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय कार्यकर्त्यांना सांगून विविध समाजाच्या वतीने किंवा संस्थांच्या वतीने गुणवंताचे सत्कार किंवा मेळावा ठेवून त्याठिकाणी देखील संपर्क वाढण्याचे साधन झाले आहे. त्याचप्रमाणे देवळाली येथे तर एका इच्छुकाने गेल्या वर्षभरापासून अनेक गावात आणि वस्तीत कीर्तन सोहळे आयोजित करून प्रचार सुरू केला आहे. अर्थात, हे सर्व आयोजन-नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबाजावणीसाठी कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक ठरला आहे. त्यामुळे सध्या कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. दररोज इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन करण्यापासून ते उमेदवाराबरोबर दिवसभर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी श्रमपरिहार म्हणून साग्रसंगीत पार्ट्या रंगू लागल्या आहेत. कार्यकर्त्यांसाठी खास हॉटेल आणि ढाबे बुक करून त्याकडे कार्यकर्त्यांना सर्रास पाठविले जाते. त्याचप्रमाणे सकाळच्या वेळी नाश्ता पाणीदेखील उमेदवारच करीत आहेत.
उमेदवारी आधीच खर्च...
साधारणत: कार्यकर्त्यांना जमवून त्यांना प्रचाराला लावणे आणि पूर्णवेळ प्रचारानंतर पार्ट्या करणे हे उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्रचाराला रंग चढू लागला की सुरू जाते. परंतु यंदा मात्र गेल्या वर्षभरापासूनच उमेदवारांच्या संपर्क मोहिमा सुरू आहेत. त्यामुळे कार्यकर्ते टिकवणे आव्हान असल्याने आतापासूनच कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी उमेदवारांना हात सैल सोडावे लागत आहे.