‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:20 AM2021-08-18T04:20:26+5:302021-08-18T04:20:26+5:30
मागील पाच वर्षांत शहरात ७८२ अपघातांत ८२५ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अपघाती मृतांमध्ये ४६७ दुचाकीस्वार असून त्यापैकी ...
मागील पाच वर्षांत शहरात ७८२ अपघातांत ८२५ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अपघाती मृतांमध्ये ४६७ दुचाकीस्वार असून त्यापैकी ३९७ दुचाकीचालकांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. यामुळे अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येकाने हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी याबाबत पेट्रोलपंप चालक, वितरकांची एकत्रित बैठक घेत ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ या संकल्पनेतून शहरातील दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेटबाबत गांभीर्य निर्माण व्हावे आणि रस्ता सुरक्षा जोपासली जावी, हा यामागील उद्देश आहे.
भुजबळ यांच्या हस्ते गंगापूर रोडवरील सदभावना पोलीस पेट्रोल पंपावर ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौघुले-श्रींगी आदी उपस्थित होते.
या मोहिमेसाठी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी २ हजार ५३ हेल्मेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. हेल्मेट न वापरल्याने रस्ते अपघातात आपल्या जवळच्या व्यक्तीला कायमचे गमावलेल्या दोघा नागरिकांनी त्यांच्या भावना मांडल्या. या वेळी त्यांना अश्रू अनावर झाले अन् त्यांनीही पोटतिडकीने नाशिककरांना हेल्मेट वापरण्याबाबत अधिकाधिक जागरूकता दाखविण्याचे आवाहन केले.
--इन्फो---
‘सद्भावना’ कठोर तर कामटे पंपावर निष्काळजी
गंगापूर रोडवरील दस्तुरखुद्द पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या सदभावना पेट्रोलपंपावर ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’बाबत अधिक कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येत होती; मात्र शरणपूर रोडवरील पोलिसांकडून चालविण्यास देण्यात आलेल्या शहीद अशोक कामटे पोलीस पेट्रोल पंपावर याबाबत काहीशी निष्काळजीही बघावयास मिळाली. विनाहेल्मेट आलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल दिले गेले, मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे नमुना अर्जसुद्धा भरून घेण्यात आले नाहीत असे प्रकार शहरातील उपनगरीय भागातील पेट्रोलपंपावरही बघावयास मिळाले.
170821\17nsk_20_17082021_13.jpg
हेल्मेट आवश्यक