आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:28 AM2018-08-01T00:28:11+5:302018-08-01T00:28:29+5:30
नाशिक जिल्हा मराठा समन्वय समिती व मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयाजवळ मंगळवारी सकाळी आंदोलन करून विविध मागण्यांसाठी विधिमंडळात अधिक आक्रमक होण्याचे आवाहन केले.
ओझर : नाशिक जिल्हा मराठा समन्वय समिती व मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयाजवळ मंगळवारी सकाळी आंदोलन करून विविध मागण्यांसाठी विधिमंडळात अधिक आक्रमक होण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार कदम यांनी बोलताना सांगितले की, शिवसेना पक्षाची भूमिका हीच माझी असल्याने गेल्या विधिमंडळ अधिवेशनात मराठा समाजाचा अंत बघू नका अन्यथा उद्रेक होईल असा इशारा
यापूर्वीच आपण सरकारला दिला होता, याचाच प्रत्यय आता येत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे हीच शिवसेना पक्षाची भूमिका असून, या अधिवेशनात मराठा समाजाची भूमिका अधिक आक्रमकपणे मांडू, अशी ग्वाही कदम यांनी सकल मराठा समाजाच्या धरणे आंदोलनप्रसंगी दिली.
मराठा समाजाच्या वतीने कदम यांच्या संपर्ककार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक तथा छावाचे जिल्हाध्यक्ष करण गायकर, पंचायत समिती सभापती राजेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक गणेश कदम, राजेंद्र देसले, तुषार जगताप, उमेश शिंदे, माधवी पाटील, शिवाजी मोरे, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष दीपक जाधव आदी उपस्थित होते. करण गायकर यांनी शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केल्याबद्दल त्यांचे आभार मानत राज्य सरकारने तातडीने मराठा आंदोलनाबाबत आपली भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. जिल्हा समन्वयक उमेश देशमुख यांनी मराठा समाजाची विधिमंडळ अधिवेशनात ठामपणे बाजू मांडावी अशी मागणी केली.
तुषार जगताप यांनी सरकार फसव्या घोषणा करीत असल्याची टिका केली. शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड यांनी शिवसेना सकल मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी वसंत गवळी, सतीश नवले, गणेश कदम यांनी सकल मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी केली. यावेळी सुभाष होळकर, केशवराव बोरस्ते, बाळासाहेब बोरस्ते, अशोक निफाडे, दशरथ रूमणे, उपसरपंच सागर शेजवळ, पं. स. सदस्य पंडितराव आहेर, ग्रा. पं. सदस्य प्रकाश महाले, संजय पगार, सतीश नवले, प्रशांत पगार, नितीन काळे, विशाल मालसाने, अमित कोळपकर, सतीश पगार, विक्रम शेजवळ आदी उपस्थित होते.
आंदोलनात राजकारण आणू नये : कदम
कदम यांनी मराठा बांधवांच्या भावनांना हात घालत ज्या लोकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. स्थगन प्रस्तावाबाबत विरोधकांचीच मोठी कोंडी झाल्याचे कदम यांनी सांगितले. या आंदोलनात कोणीही राजकारण आणू नये. समाजासाठी सर्वात पहिली भूमिका मीच मांडून आताच्या परिस्थितीची जाणीवदेखील करून दिली होती. ओझर येथील मोठा बंदोबस्त तैनात होता; परंतु शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन पार पडले.