अजित पवार गटाच्या आमदारांना आता शरद पवार गटात नो एन्ट्री!
By संजय पाठक | Published: May 26, 2024 10:58 AM2024-05-26T10:58:48+5:302024-05-26T10:59:27+5:30
नाशिकमधील जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय.
संजय पाठक, नाशिक: लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार आणि काही पदाधिकारी पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांना शरद पवार गटात पुन्हा प्रवेश देऊ नये असा ठराव नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीत घेण्यात आला.
प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. केवळ सत्ता आणि अमिषा पोटी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला एकटे टाकून आमदार आणि नेते अजित पवार गटात सामील झाले. मात्र, आता राजकीय वातावरण बदलू लागल्याचे पाहताच अनेक जण पुन्हा पक्षात प्रवेश येण्याच्या तयारीत आहेत मात्र त्यांना आता प्रवेश दिला जाणार नाही अशी भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आली. बैठकीला शाहू शिंदे, किरण भुसारे,दिनेश धात्रक, गोरख ढोकणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.