मनसेचा हल्लाबोल : नाशिकच्या परिवहन महामंडळाच्या आगारात बसेसवर चढून आंदोलन; परिवहन मंत्र्यांच्या कारभाराविरुध्द घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 02:09 PM2017-11-28T14:09:12+5:302017-11-28T14:18:23+5:30
विविध मागण्यांचे निवेदन स्विकारण्यासाठी आगारामध्ये जबाबदार अधिकारी नसल्याने आंदोलनकर्त्यांना निवेदन द्यायचे कुणाला असा प्रश्न पडला होता. यावेळी संतप्त मनविसेच्या कार्यकर्त्यांनी विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांच्या दालनात ठिय्या देत जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
नाशिक : महामंडळाला शहर बस वाहतूक आर्थिकदृष्टया तोट्यात घेऊन जात असल्याचे सांगून मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशान्वये नाशिकच्या विभाग नियंत्रकांनी शहर बस वाहतुकीच्या फे-यांमध्ये कपात सुरू केली आहे. याचा सर्वाधिक फटका हा शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. एकीकडे बसफे-यांमध्ये होणारी कपात आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून मासिक प्रवास भाडे पासेसचे आकारले जाणारे पैसे याविरोधात महराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने नाशिकच्या आगारामध्ये हल्लाबोल केला. यावेळी विभाग नियंत्रक शहराबाहेर दौ-यावर असल्याचे समजल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. सर्व कार्यकर्त्यांनी आगारामध्ये उभ्या असलेल्या बसेसवर चढून आंदोलन सुरू केले. जोरदार घोषणाबाजी करत परिवहन मंत्र्यांसह विभाग नियंत्रकांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध नोंदविला. विविध मागण्यांचे निवेदन स्विकारण्यासाठी आगारामध्ये जबाबदार अधिकारी नसल्याने आंदोलनकर्त्यांना निवेदन द्यायचे कुणाला असा प्रश्न पडला होता. यावेळी संतप्त मनविसेच्या कार्यकर्त्यांनी विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांच्या दालनात ठिय्या देत जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. कार्यकर्त्यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन चिकटविण्याची तयारी सुरू केल्याची कुणकुण लागताच वाहतुक अधिक्षकांनी दालनात येऊन आंदोलनाचे नेतृत्व करणारे पदाधिकारी प्रदेशउपाध्यक्ष खंडेराव मेढे, संदीप भवर, जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, शहराध्यक्ष शाम गोहाड, दिपक चव्हाण, कौशल पाटील, तुषार भंदुरे आदिंच्या शिष्टमंडळाकडून निवेदन स्विकारले. येत्या दोन दिवसांमध्ये पुन्हा शिष्टमंडळासोबत चर्चा करुन शाळा-महाविद्यालयच्या मार्गावरील बसफे-या वाढविण्याबाबत निर्णय घेणार आहे. सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुन्हा जोरदार आंदोलन करुन शहर बस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संदीप भवर यांनी यावेळी सांगितले.