मनसेचा निवडणूक लढविण्याचा फैसला सोमवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 07:13 PM2019-09-28T19:13:20+5:302019-09-28T19:18:06+5:30
राज ठाकरे यांच्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता राज्यातील राजकीय वातावरण तापविण्यास सुरुवात केली असली तरी, विधानसभा निवडणुकीत मनसे रिंगणात उतरेल किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी मनसे कॉँग्रेस आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवेल अशी चर्चा रंगली
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने राज्याची विधानसभा निवडणूक लढवायची किंवा नाही याचा अंतिम फैसला आता सोमवारी (दि.३०) होणार असून, पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यानिमित्ताने पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व राज्यातील इच्छुक उमेदवारांना बैठकीसाठी पाचारण केले आहे. या बैठकीत सर्वांचे मत जाणून घेतल्यानंतर ठाकरे हे निवडणुकीविषयी आपला निर्णय जाहीर करतील. ज्या अर्थी ठाकरे यांनी इच्छुक उमेदवारांना या बैठकीसाठी पाचारण केले आहे त्या अर्थी मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, असा अंदाज बांधला जात आहे.
राज ठाकरे यांच्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता राज्यातील राजकीय वातावरण तापविण्यास सुरुवात केली असली तरी, विधानसभा निवडणुकीत मनसे रिंगणात उतरेल किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी मनसे कॉँग्रेस आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवेल अशी चर्चा रंगली होती. परंतु कॉँग्रेसकडून मनसेला सोबत घेण्याबाबत सकारात्मकता न दर्शविल्याने ही चर्चा मागे पडली. मात्र त्याचवेळी ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात घेतलेली जाहीर भूमिका व त्यातून त्यांनी अन्य पक्षांना विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी घातलेली गळ पाहता, महाराष्टÑ नवनिर्माण सेना निवडणूक लढविणार नाही, असा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली गेली होती. त्यामुळे अखेर कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी मनसेने विधानसभा निवडणूक लढविण्याबाबतची तयारी सुरू केली. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन इच्छुकांच्या मुलाखती घेण्याबरोबरच विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थिती जाणून घेतली. मात्र त्याबाबतची कार्यवाही पूर्ण होवून पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही राज ठाकरे यांनी कोणतीही भूमिका अद्याप जाहीर केलेली नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने मनसेला काही तरी निर्णय लवकर घ्यावी लागणार असून, त्यापार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत सकाळी १० वाजता राज ठाकरे यांनी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष व इच्छुक उमेदवारांना पाचारण केले आहे. पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही, त्यांनी बैठकीसाठी येऊ नये अशा सूचनाही पक्षाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत पक्षाची अधिकृत भूमिका ठाकरे यांच्याकडून जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.