मनसे वाद : कॉँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध कॉँग्रेस कार्यालयाला बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 01:28 AM2017-12-02T01:28:00+5:302017-12-02T01:28:53+5:30
महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने मुंबईच्या कॉँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर कॉँग्रेस कमिटीच्या कार्यालयाला पोलीस बंदोबस्त देण्यात आला.
नाशिक : महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने मुंबईच्या कॉँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर कॉँग्रेस कमिटीच्या कार्यालयाला पोलीस बंदोबस्त देण्यात आला. कॉँग्रेस कार्यकर्त्यांना याचा सुगावा लागताच त्यांनी तातडीने कमिटीत धाव घेत, पोलीस संरक्षणाची गरज नसल्याचे सांगत मनसेच्या भ्याड कृत्याचा निषेध केला.
मुंबईत फेरीवाल्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वाद सुरू असून, या वादात कॉँग्रेसने उडी घेतल्यामुळे त्याला राजकीय वळण लागले. मुंबई कॉँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे तर मनसे अधिक चवताळली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी कॉँग्रेसचे मुंबई येथील कार्यालय उघडल्यानंतर अज्ञात इसमांनी त्यावर हल्ला चढवून तोडफोड केली. त्यामुळे राजकीय तणाव निर्माण झालेला असताना मनसेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात त्याचे पडसाद उमटू नये म्हणून पोलिसांनी तातडीने महात्मा गांधी रो डवरील कॉँग्रेसच्या कार्यालयाबाहेर सकाळी दहा वाजता सशस्त्र बंदोबस्त तैनात केला. कॉँग्रेस कार्यालयाला पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती कळताच कार्यकर्त्यांनी धाव घेत पोलिसांना त्याबाबत विचारणा केली. अगोदर पोलिसांनी थातूरमातूर उत्तरे दिली, परंतु कार्यकर्त्यांनी आम्हाला बंदोबस्ताची गरज नाही, असे सांगितल्यावर त्यांना उलगडा झाला. कॉँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर, बबलू खैरे, मुन्ना ठाकूर, सुनील आव्हाड, ज्युली डिसूझा आदी कार्यकर्त्यांनी दिवसभर कॉँग्रेस कार्यालयात तळ ठोकला व त्यानंतर सभा होऊन त्यात हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.