शालेय शुल्क कमी करण्याची मनसेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:06+5:302021-06-30T04:10:06+5:30
पंचवटी : कोरोना विषाणू वाढता संसर्गामुळे गेल्यावर्षी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले ...
पंचवटी : कोरोना विषाणू वाढता संसर्गामुळे गेल्यावर्षी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांना पास करून त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला असला तरी शाळा भरलेल्या नसताना शाळा प्रशासनाकडून पालकांना पूर्ण वर्षभराची फी भरण्याची सक्ती केली जात आहे. अशाप्रकारे शुल्क वसुलीला मनसेतर्फे विरोध करण्यात आला असून यासंदर्भात आपण शालेय शिक्षणमंत्र्यांकडे
शुल्क माफ करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी दिली आहे.
कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले असून त्यात आता शहरातील विविध शाळा पालकांना पूर्ण वर्षाचे शुल्क भरण्यासाठी मोबाईल व्हाॅट्स ॲपवर मेसेज करत असल्याने पालक त्रस्त झाले आहेत. शाळांनी शुल्क कमी करावे अन्यथा आंदोलनाचा इशाराही मनसेतर्फे देण्यात आला आहे. गेल्यावर्षी शाळा सुरू झाल्या नाही तरीही शाळा प्रशासन विद्यार्थी व पालकांना शुल्क भरण्याची सक्ती करत आहेत. जे विद्यार्थी शुल्क भरू शकत नाही त्यांना शाळेतील ऑनलाइन ग्रुपमधून डिलीट करण्याचे प्रकार सुरू आहेत. शाळा प्रशासनाने शुल्क भरण्यासाठी मुदत देऊन शुल्क कमी केले तर आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना दिलासा मिळेल त्यामुळे शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने तत्काळ दखल घेत संबंधित शाळांना शुल्क कमी करण्याच्या सूचना करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.