मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:14 AM2021-03-15T04:14:41+5:302021-03-15T04:14:41+5:30
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नाशिक जिल्ह्यात रविवार (दि. १४)पासून सदस्य नोंदणीला सुरूवात झाली असून, आगामी महापालिका व ...
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नाशिक जिल्ह्यात रविवार (दि. १४)पासून सदस्य नोंदणीला सुरूवात झाली असून, आगामी महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेतर्फे संघटनात्मक बळकटीवर भर देण्यात येत आहे.
मनसेतर्फे संपूर्ण राज्यासह नाशिकमधील पक्षाच्या ठक्कर बाजार येथील मध्यवर्ती राजगड कार्यालयासह उपनगरांमधील विविध कार्यालयांमध्ये ऑनलाईन सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ऑफलाईन सदस्य नोंदणीसाठी तालुकानिहाय प्रत्येकी पाचशे सदस्यत्व नोंदणी अर्जांचे वाटप करण्यात आले असून, ऑनलाईन नोंदणीसाठीही सूचना करण्यात आल्या आहेत. नाशिक शहरात सोमवारपासून ऑफलाईन नोंदणीसाठी प्रत्येक प्रभागातील पदाधिकाऱ्यांना एक हजार अर्जांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रभागातील कार्यालयांमध्ये ऑनलाईन नोंदणीसाठीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोबाईलच्या माध्यामातूनही बार कोड स्कॅन करून आणि मिस्ड कॉलद्वारे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सदस्यत्व नोंदणी करता येत असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी मोबाईलच्या माध्यमातूनच सदस्यत्व नोंदणी केल्याचे दिसून आले. दरम्यान, ऑनलाईन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.