मनसे करणार आत्मपरीक्षण निकालामुळे धक्का : विधानसभेची तयारी लवकरच
By admin | Published: May 17, 2014 11:52 PM2014-05-17T23:52:25+5:302014-05-18T00:21:39+5:30
नाशिक : लोकसभा निवडणुकीत मनसेला पराभवाचा मोठा धक्का बसला आणि अनामत रक्कमही जप्त झाली. त्यामुळे या धक्क्यातून सावरून आता आत्मपरीक्षण करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. हीच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीची सुरुवात ठरणार आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीत मनसेला पराभवाचा मोठा धक्का बसला आणि अनामत रक्कमही जप्त झाली. त्यामुळे या धक्क्यातून सावरून आता आत्मपरीक्षण करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. हीच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीची सुरुवात ठरणार आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत दुसर्या क्रमांकाची मते मिळवणार्या मनसे उमेदवाराने राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांची मोठी दमछाक केली होती. त्यामुळे अवघ्या २२ हजाराने समीर भुजबळ विजयी झाले होते. परंतु यंदाच्या निवडणुकीत असे आव्हान निर्माण करण्यात पक्षाला यश आले नाही. डॉ. प्रदीप पवार यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर सुशिक्षित चेहरा तसेच मनसेचा प्रभाव या सर्व कारणांमुळे पक्षाला यश मिळेल याची खात्री पक्षाला होती. परंतु तसे घडले नाही. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची लढत शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्याशीच झाली. डॉ. प्रदीप पवार तिसर्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना ६३ हजार मते मिळाली. एक लाखभरही मते मिळू न शकल्याने पक्षात अस्वस्थता आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असल्याने पराभव झाल्याचे पक्षाचे सरचिटणीस आमदार वसंत गिते यांनी मान्य केले. परंतु पक्षाला अपेक्षेपेक्षा खूपच कमी मते मिळाली हे देखील त्यांनी धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात पक्ष लवकरच आत्मपरीक्षण करेल, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागले असल्याने विधानसभा निवडणुकीविषयी आताच पक्षात चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता लवकरच विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली जाणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.