उमेदवारांसाठी मनसेची प्रश्नावली
By admin | Published: January 24, 2017 11:20 PM2017-01-24T23:20:32+5:302017-01-24T23:20:53+5:30
मुलाखतीस प्रारंभ : महिलांचा लक्षणीय सहभाग
नाशिक : महापालिकेत पाच वर्षे सत्तेचे सिंहासन सांभाळणाऱ्या मनसेने यंदा इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा न घेता एका प्रश्नावलीद्वारे त्यांच्याशी संवाद साधला. मंगळवारी (दि.२४) दिवसभरात पंचवटी, नाशिकरोड व नाशिक मध्यमधील सुमारे २५० इच्छुकांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली. यामध्ये तरुणाईसह महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. बुधवारी (दि. २५) नाशिक मध्य, सिडको व सातपूर विभागांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. काळ मनसेचीच परीक्षा पाहत असताना यंदा पक्षाने इच्छुक उमेदवारांची परीक्षा न घेता साध्या - सोप्या प्रश्नावलीद्वारे त्यांच्याशी संवाद साधला. मंगळवारी (दि. २४) मनसेच्या ‘राजगड’ कार्यालयात पक्षनेते बाळा नांदगावकर, संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर, प्रदेश पदाधिकारी डॉ. प्रदीप पवार, राहुल ढिकले, महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, गटनेता अनिल मटाले यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. पहिल्या दिवशी पंचवटीतील प्रभाग क्रमांक १ ते ६ आणि नाशिकरोडमधील प्रभाग क्रमांक १७ ते २२ तसेच नाशिक मध्यमधील प्रभाग क्रमांक ७,१४,१६ आणि २३ मधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी इच्छुकांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यात प्रामुख्याने, प्रभागात आपले वास्तव्य आहे काय, प्रभागाची रचना, लक्षवेधी समस्या, त्या सोडविण्यासाठी कोणता कार्यक्रम हाती घेणार, पक्षाच्या नगरसेवकाने केलेली कामे मतदारांपुढे घेऊन जाण्यात कोणता कार्यक्रम हाती घेतला, कोणता विकासनामा घेऊन जाणार, पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी कसा समन्वय आहे आणि सोशल मीडियाच्या प्रचार यंत्रणेबाबत काय तयारी केलेली आहे आदि प्रश्नांचा समावेश होता. यावेळी मुलाखतीसाठी तरुणाईबरोबरच महिलावर्गाचा लक्षणीय सहभाग दिसून आला. (प्रतिनिधी)