मनसे जिल्ह्यातील सर्व जागा लढविणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 01:00 AM2019-09-22T01:00:58+5:302019-09-22T01:01:36+5:30
पुन्हा मैदानात उतरायचंय, ते जिंकण्यासाठीच! असा निर्धार व्यक्त करीत महानगरासह जिल्ह्यातील सर्व १५ जागा लढविणार असल्याचे प्रतिपादन मनसे प्रवक्ते अभिजित पानसे यांनी शनिवारी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.
नाशिक : पुन्हा मैदानात उतरायचंय, ते जिंकण्यासाठीच! असा निर्धार व्यक्त करीत महानगरासह जिल्ह्यातील सर्व १५ जागा लढविणार असल्याचे प्रतिपादन मनसे प्रवक्ते अभिजित पानसे यांनी शनिवारी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.
महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या गजबजलेल्या पक्ष कार्यालयातील बैठकीत मनसेचे प्रवक्ता संदीप देशपांडे, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, मनोज घोडके, सुजाता डेरे, अर्चना जाधव, भानुमती अहिरे आदी पदाधिकारी आणि अन्य सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीत बोलताना पानसे यांनी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारवर ताशेरे ओढले.
या सरकारने केवळ भूमिपूजने आणि घोषणा करण्यातच त्यांचा सगळा काळ खर्च केला. हे केवळ बोलघेवडे सरकार असून, त्यांनी सामान्यांच्या समस्यांमध्ये भर घालण्याचेच काम केले आहे. त्यामुळे या सर्व बाबी प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन सांगाव्यात. त्यातूनच या सरकारच्या विरोधी जनमत तयार होणार असून, हे जनमतच निर्णायक ठरेल, असा विश्वास पानसे यांनी व्यक्त केला.
बैठकीच्या प्रारंभी बोलताना देशपांडे यांनी उमेदवार कोण असेल? त्याचा विचारदेखील करू नका. तो विचार राजसाहेब यांच्याकडून केला जाऊनच उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे दिलेला उमेदवार हा राजसाहेबच आहेत, असे समजून तुम्ही त्यांना जिंकविण्यासाठीच लढा, असे आवाहनदेखील त्यांनी केले. प्रत्येक कार्यकर्त्याने किमान ५० ते १०० घरांमध्ये जाऊन निवडणुकीसाठी प्रचार करावा, असेही देशपांडे यांनी नमूद केले.
राजगड पुन्हा बहरले
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मनसेच्या नाशिकमधील राजगड या कार्यालयाला मरगळ आली होती. त्यातच २०१७ च्या निवडणुकीत महापालिकादेखील हातून गेल्यानंतर राजगड कार्यालय तर बहुतांश वेळा ओस पडल्याचेच चित्र होते.
४मात्र, मनसेने यंदाची निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्यानंतर शुक्रवारपासून गजबजू लागलेले राजगड कार्यालय शनिवारी पुन्हा खऱ्या अर्थाने बहरल्याचे चित्र दिसून आले.
मनसेने जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पंधरा जागांवर उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले असले तरी नाशिक शहरी भाग वगळता अन्यत्र मनसेचे फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये मनसेला ताकदवान व निवडणूक जिंकण्याचे मेरिट असलेले उमेदवार मिळणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु, मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी पक्षाबाहेरीलही उमेदवार असू शकतील असे सूतोवाच केल्याने आयारामांना संधी मिळू शकते.
ढिकलेंची अनुपस्थिती
ठरली चर्चित
राजकीय वारसा लाभलेले आणि पूर्व विधानसभेतील एक इच्छुक उमेदवार असलेले राहुल ढिकले यांची या सभेला असलेली अनुपस्थिती बैठकीनंतर विशेष चर्चित ठरली. राहुल हे पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांनी यामुळे पुन्हा एकदा वेग घेतला.
४या मतदारसंघातील भाजपची उमेदवारी बदलण्याची चर्चा लक्षात घेता ढिकले यांनी मध्यंतरी मनसे नेते व निशाणी टाळून आपला प्रचार केल्याचे दिसून आले होते.