मनपा निवडणुकीत मनसे भाजपचं जमणार!
By संजय पाठक | Published: February 25, 2021 11:32 PM2021-02-25T23:32:17+5:302021-02-25T23:36:30+5:30
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तसे भाजपचे वावडे कधीच नव्हते. राज्यातील पहिली सत्ता नाशिकमध्ये आणण्यासाठी भाजपचे बोट धरूनच मनसेने प्रवास केला आहे. राज्यातील प्राप्त परिस्थितीनुसार आता आगामी महापालिका निवडणुकामंध्ये मनसे- भाजप एकत्र दिसल्यास नवल नाही. अर्थात दोन्ही पक्षांची एकंदर धारणा बघितली तरी उभय पक्षांची निवडणूक पश्चात युतीच होऊ शकेल अथवा यंदाच्या कारकीर्दीच्या वेळी हे पक्ष संकट समयी एकमेकांना आधार देऊ शकतील.
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तसे भाजपचे वावडे कधीच नव्हते. राज्यातील पहिली सत्ता नाशिकमध्ये आणण्यासाठी भाजपचे बोट धरूनच मनसेने प्रवास केला आहे. राज्यातील प्राप्त परिस्थितीनुसार आता आगामी महापालिका निवडणुकामंध्ये मनसे- भाजप एकत्र दिसल्यास नवल नाही. अर्थात दोन्ही पक्षांची एकंदर धारणा बघितली तरी उभय पक्षांची निवडणूक पश्चात युतीच होऊ शकेल अथवा यंदाच्या कारकीर्दीच्या वेळी हे पक्ष संकट समयी एकमेकांना आधार देऊ शकतील.
राज ठाकरे यांच्या पक्ष स्थापनेपासून नाशिकमध्ये त्यांचा करिश्मा दिसला आहे. तीन आमदार आणि महापालिकेतील सत्ता इतके सर्व भरभरून नाशिकमध्येच मिळाले. मनसेच्या काळात नाशिकचा विकास झाला किंवा नाही आणि त्यामुळे त्यांना याच शहरात पुन्हा सत्ता मिळण्यापेक्षा क्षीण स्थितीला सामोरे जावे लागले हा इतिहास झाला. आता मधल्या काळात मोदी विरोध ते हिंदुत्वाच्या समर्थनामुळे पुन्हा भाजपशी जवळीक असे सर्व बदलणारे चित्र नाशिककरांनी देखील बघितले आहे. त्यामुळे आता राज्यातील मुंबई, पुणे, नाशिकसह आगामी काळातील दहा महापालिकांच्या निवडणुका हाेऊ घातल्या आहेत. त्यात मनसेचा देखील प्रभाव असलेल्या नाशिकसारख्या शहरात भाजप आणि मनसे एकत्र दिसतील, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज्यात पक्ष स्थापन केल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका बघितली तरी निवडणुकीत एकला चलो रे, असाच मार्ग त्यांनी स्वीकारला होता. नाशिकमध्ये सत्ता आली तेव्हा म्हणजेच २०१२ मध्ये सुद्धा मनसेचे स्वबळावर ४० नगरसेवक निवडून आल्यानंतरच बहुमतासाठी आवश्यक ती मॅजिक फिगर पूर्ण करण्यासाठी त्यांनी भाजपची मदत घेतली होती. अर्थात पहिल्या अडीच वर्षांनंतर भाजपशी बिनसल्यानंतर पुन्हा सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांचे समर्थक अपक्ष यांची साथ मनसेने घेतली होती. त्यामुळे राजकारणात सत्तेसाठी अशा प्रकारच्या तडजोडी मनसेला कधीही त्याज्य नाहीत हे अगोदरच स्पष्ट झाले आहे. आता यापेक्षा वेगळे काही होईल असे काही नाही. पण त्यातल्या त्यात शिवसेना आणि कॉंग्रेस- राष्ट्रवादी एकत्र असताना मनसे भाजपच्या जवळ असेल असेच गणित मांडले जात आहे.
नाशिकमध्ये भाजपाची सत्ता आली त्यानंतर महापालिकेतही सत्ता आली हे सर्व राज्यातील सत्तेचे फलीत होते आणि अशा प्रकारच्या सत्तेची फळे चाखण्यासाठी मनसेसह सर्वच पक्षातील आयाराम दाखल झाले होते. राज्यातील सत्तातरांनंतर आता त्यांनाहीच फळे कडू लागणे स्वाभाविक आहे. त्यामुळे २०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणूकीत ज्या प्रमाणे मनसेची एकेक करीत साथ सोडून गेले तसेच काहीसे भाजपचे होईल असे मानले जात आहे. ते खरे ठरलेच तर महापालिकेच्या निवडणूकीत काहीही होऊ शकते. मनसे आणि भाजपा यांची गणिते अशावेळी जुळू शकतील, असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही.
महापालिकेच्या यंदाच्या पंचवार्षिक कारकिर्दीत महापौरपदाची दुसऱ्यांदा निवडणूक झाली, तेव्हा प्रचंड कठीण काळ, महाविकास आघाडीची एकजूट असताना देखील मनसेने भाजपाला साथ दिली आणि विरोधकांचे मनसुबे उधळून लावले होते, त्यामुळे भाजपशी मैत्रीचे नाते आहेच, परंतु महापालिका निवडणूकीनंतर ते अधिक घट्ट होऊ शकते.