‘मनसे’ आता कारभार करणार ‘दिलसे...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:20 AM2021-09-16T04:20:32+5:302021-09-16T04:20:32+5:30
पक्षाच्या स्थापनेपासूनच मनसेत गटबाजी हेाती. काही नेत्यांच्या हाती पक्षाची सूत्रे गेल्याने अंतर्गत खदखद हाेती यातील बहुतांश नेते आता पक्षात ...
पक्षाच्या स्थापनेपासूनच मनसेत गटबाजी हेाती. काही नेत्यांच्या हाती पक्षाची सूत्रे गेल्याने अंतर्गत खदखद हाेती यातील बहुतांश नेते आता पक्षात नसले तरी पक्षातील बेदीली थांबलेली नाही. मोजक्याच नेत्यांच्या हाती सूत्रे असल्याने गटबाजी वाढत आहे, निष्ठेने पक्षासाठी काम करणाऱ्यांना देखील कामे- आंदाेलने करू दिली जात नाही तसेच एकमेकांना विश्वासात न घेताच बैठका आंदाेलने तसेच अन्य अन्य उपक्रम राबवले जात असल्याने त्याबाबत वरिष्ठ पातळीपर्यंत तक्रारी गेल्या आहेत. राज ठाकरे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून मिशन नाशिक महापालिका हाती घेतल्यानंतर ते स्वत: नाशिकमध्ये दाखल झालेच परंतु अमित ठाकरे तसेच संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, अमेय खोपकर अशा नेत्यांना नाशिकमध्ये पाठवून त्यांनी कार्यकर्त्यांची मते भावना आणि तक्रारी जाणून घेतल्या आहेत. आता पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी राज यांनी त्यांची गंभीर दखल घेण्याच्या आत आणि २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर धावपळ सुरू झाली आहे. बुधवारी (दि.१५) राजगडावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी राज यांना अपेक्षीत असलेली कामगिरी करण्यासाठी यापूढे कटिबद्ध राहणार असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीत माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी आगामी निवडणुकीसाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी शाखाध्यक्ष नियुक्तींसदर्भातील मेळावा आयोजित करण्याचे नियोजन सांगितले तर शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती दिली. विभाग अध्यक्षांच्या माध्यमातून मेळावे आयोजित करण्याबाबत रतनकुमार इचम यांनी माहिती दिली.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, माजी नगरसेविका सुजाता डेरे, प्रभाग सभापती योगेश शेवरे, नितीन साळवे, सत्यम खंडाळे, महिला आघाडीच्या कामिनी दोंदे, अर्चना जाधव, स्वागता उपासनी, अरुणा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
इन्फो...
नाशिक शहरात फलक बाजांवर कारवाईसाठी आता पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय सरसावले आहेत. त्यांनी फलकबाजांवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली असल्याने मनसेने आताच काळजी घेत राज ठाकरे यांच्या स्वागताचे सर्व फलक परवानगी घेऊनच लावण्याचे आवाहन बैठकीत केेले आहे.