मनसेच्या माघारीने पूर्वमध्ये सानप-ढिकले यांच्यात लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 08:25 PM2019-10-07T20:25:14+5:302019-10-07T20:25:43+5:30

नाशिक पूर्व मतदारसंघात यंदा उमेदवारी वाटपावरून नाट्यमय घटना घडल्या आहेत. भाजपाने विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारून मनसेचे इच्छुक राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली, तर मनसेने ऐनवेळी माजी महापौर अशोक मुर्तडक यांचे नाव जाहीर केले.

MNS withdrawals fight against Sanap-Dikhle in the east | मनसेच्या माघारीने पूर्वमध्ये सानप-ढिकले यांच्यात लढत

मनसेच्या माघारीने पूर्वमध्ये सानप-ढिकले यांच्यात लढत

Next

लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : भाजपाने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यामुळे राष्टÑवादीत प्रवेश करून उमेदवारी खिशात घालणारे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्यामुळे नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपाचे राहुल ढिकले व राष्टÑवादीचे बाळासाहेब सानप यांच्यात सरळ लढत होणार आहे.


नाशिक पूर्व मतदारसंघात यंदा उमेदवारी वाटपावरून नाट्यमय घटना घडल्या आहेत. भाजपाने विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारून मनसेचे इच्छुक राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली, तर मनसेने ऐनवेळी माजी महापौर अशोक मुर्तडक यांचे नाव जाहीर केले. बाळासाहेब सानप यांना राष्टÑवादीने ऐनवेळी गळाला लावून त्यांना रातोरात ए व बी फॉर्म देऊन उमेदवारीही जाहीर केली. आघाडीच्या जागावाटपात नाशिक पूर्व मतदारसंघ कॉँग्रेसच्या वाट्याला गेला होता. कॉँग्रेसकडे या मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्यामुळे त्यांनी कवाडे गटाला ही जागा सोडली व माजी नगरसेवक गणेश उन्हवणे यांनी उमेदवारी दाखल केली होती. परंतु माघारीच्या दिवशी नाट्यमय घटना घडून मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी अचानक माघार घेतली व पक्षाची तसेच आपली स्वत:ची पुरेशी निवडणूक तयारी नसल्याची कबुली दिली. मुर्तडक यांनी माघार घ्यावी यासाठी राष्टÑवादीने पुरेपूर प्रयत्न केले व त्याला यश मिळाले. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी कवाडे गटाचे गणेश उन्हवणे यांनी माघार घ्यावी यासाठी सोमवारी सकाळी राष्टÑवादी व कॉँग्रेसच्या नेत्यांनी उन्हवणे यांची मनधरणी केली, परंतु त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळे पूर्व मतदारसंघात आता भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत होणार असली तरी, कवाडे गट कॉँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी करणार आहे तसेच वंचित बहुजन आघाडीने संतोष अशोक नाथ यांना उमेदवारी दिली आहे. कवाडे गटाने आपली उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघात कॉँग्रेस काय भूमिका घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

Web Title: MNS withdrawals fight against Sanap-Dikhle in the east

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.