सिडको कार्यालयावर ‘मनसे’चा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:05 AM2018-03-22T00:05:21+5:302018-03-22T00:16:12+5:30
कार्यालयातील गैरव्यवहार त्वरित बंद करावे तसेच घर हस्तांतरणासाठी लावलेले वाढीव शुक्ल त्वरित रद्द करून ९९ वर्षांच्या कराराने दिलेल्या घरांना मालकी हक्क द्या यासंह विविध मागण्यांसाठी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सिडको प्रशासकीय कार्यालयावार मोर्चा काढण्यात आला.
सिडको : कार्यालयातील गैरव्यवहार त्वरित बंद करावे तसेच घर हस्तांतरणासाठी लावलेले वाढीव शुक्ल त्वरित रद्द करून ९९ वर्षांच्या कराराने दिलेल्या घरांना मालकी हक्क द्या यासंह विविध मागण्यांसाठी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सिडको प्रशासकीय कार्यालयावार मोर्चा काढण्यात आला. सिडको प्रशासनाने नागरिकांना कराराने दिलेली घरे फ्री होल्ड (मालकी हक्क) करावी यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष अनिल मटाले, सिडको विभाग अध्यक्ष रामदास दातीर, शहर सरचिटणीस अॅड. अतुल सानप यांच्या नेतृत्वाखाली सिडको प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना सिडकोची घरे फ्री होल्ड करावी याबाबत आदेशित केले आहे. यास बराच कालावधी उलटूनही यावर अद्यापही तोडगा निघाला नसल्याने या प्रश्नाबाबत आता मनसेने पुढाकार घेतला आहे. सिडको प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी विकत घेत त्या जागेवर सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा किमतीत टप्प्याटप्प्याने सुमारे पंचवीस हजार घरांचे बांधकाम केले असून, ही सर्व घरे सिडकोने नागरिकांना ९९ वर्षांच्या करारावर दिली आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री व सिडको संचालकांच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत सिडकोने लीजवर दिलेली संपूर्ण घरे फ्री होल्ड (मालकी हक्क) करावी याबाबतची बोलणी झाली होती. याबाबत अद्याप काहीच हालचाली झाल्या नसल्याने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सहावी योजनाही मनपाकडे हस्तांतरित करण्यात आल्याने आता सिडकोला कोणताही कर आकारण्याचा अधिकार नसल्याने एक ते सहा योजना या लवकरच फ्री होल्ड करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी मनसेच्या वतीने सिडको प्रशासक अनिल झोपे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शहर संघटक नितीन माळी, अरुण वेताळ, संदीप दोंदे, राजू परदेशी, मनोज सोनवणे, हेमंत अहेर, विश्वास कुमावत, प्रवीण महाले, संदेश जगताप, प्रणव मानकर, चेतन वरखेडे, विशाल वरखेडे आदी उपस्थित होते.