मनसेची ट्वेंटी-ट्वेंटी; शहरात अचानक येणार ‘नवनिर्माणा’ला भरते!
By admin | Published: June 19, 2014 12:33 AM2014-06-19T00:33:25+5:302014-06-19T00:53:45+5:30
नाशिक : दोन वर्षांत जे झाले नाही ते अवघ्या सहा महिन्यांत करण्याच्या तयारीला मनसे लागली असून, त्याची सूत्रे आता थेट राज ठाकरे यांनीच हाती घेतल्याचे दिसत आहे.
नाशिक : दोन वर्षांत जे झाले नाही ते अवघ्या सहा महिन्यांत करण्याच्या तयारीला मनसे लागली असून, त्याची सूत्रे आता थेट राज ठाकरे यांनीच हाती घेतल्याचे दिसत आहे. आठवडाभराच्या अंतरात ठाकरे दुसऱ्यांदा नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, दुपारी कल्पक प्रकल्पांची आखणी करण्यासाठी प्रायोजकांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.
गेल्या आठवड्यात नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी सध्या मनसेची सायलेंट मुव्ही सुरू असल्याचे वक्तव्य केले होेते. त्यानंतर येत्या सहा महिन्यांत शहरात मोठे बदल झाल्याचे दिसेल, असे स्पष्ट केले होते. त्याची तयारी सध्या सुरू असून, त्याच पार्श्वभूमीवर राज यांचा अवघा आठवडाभरातील हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मनसेच्या काळात राज ठाकरे यांनी प्रायोजकांना गळ घालून गोदापार्कचे नूतनीकरण आणि त्यावरच मनोरंजन पार्कसारखे प्रकल्प उभारण्यास रिलायन्स फाउंडेशनला राजी केले. सादरीकरण आणि भूमिपूजनात प्रचंड वेळ गेलाच; परंतु त्यानंतरही हा प्रकल्प रखडला होता. पालिकेत मनसेची सत्ता असतानादेखील रिलायन्सला अनेक अडथळे पार पाडावे लागले आणि राज ठाकरे यांनी लक्ष घातल्यानंतर हा विषय मार्गी लागला. रिलायन्सने या कामासाठी ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली असून, दोन दिवसांपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. त्याची पाहणी राज या दौऱ्यात करण्याची शक्यता आहे. याशिवाय पेलिकन पार्कसह अन्य प्रकल्पांना भेटीसाठी नियोजन सुरू आहे.
गुरुवारी दुपारी तीन ते चार वाजेदरम्यान राज हे मुंबईहून नाशिकला शासकीय विश्रामगृहावर पोहोचतील. त्यानंतर पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा तसेच पालिकेतील विविध प्रकल्पांविषयी प्रायोजकांशी चर्चा करण्यात येणार आहे. नाशिक मुक्कामी असलेले राज शुक्रवारी मुंबईस परतणार आहेत. (प्रतिनिधी)